नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच केंद्रीय भूपृष्ठवाहतूक व ग्रामविकासमंत्री नितीन गडकरी दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर बुधवारी जात आहेत. पण त्यांनी सार्वजनिक स्वागत सत्कार करू नये, हार - गुच्छे देऊ नयेत, स्वागत कमानी लावू नका, फ्लेक्सबाजी करू नका अशा सूचना प्रदेश भाजपाला दिल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष व तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या गडकरींच्या या दौ:याला पक्षीय नव्हे, तर शासकीय स्वरूप उरले आहे. मात्र ते पक्ष पदाधिकारी व कार्यकत्र्याना भेटी देणार आहेत.
शपथविधीनंतर महिनाभर व तत्पूर्वी एक महिना असे तब्बल दोन महिने गडकरी मुंबईत गेलेले नाहीत. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाच्या पाश्र्वभूमीवर ते 25 व 26 रोजी प्रथमच मुंबईत जात आहेत. त्यामुळे या पहिल्या दौ:यात साधेपणा कटाक्षाने पाळला जावा असे आवाहन त्यांनी केल्याचे त्यांच्या येथील कार्यालयीन सूत्रंनी सांगितले.
मुंबईतील त्यांचे दोन दिवसांतील कार्यक्रम पोर्ट ट्रस्टशी संबंधित आहेत. 25 रोजी सकाळी 10 वाजता ते मुंबईत पोहतच असले, तरी दुपारी 3 ते 5 या वेळात सी फेअर डे चा कार्यक्रम शिवाजी पार्कच्या स्वातंत्र्यवीर सावरकर ऑडिटोरिअममध्ये आहे. सायंकाळी सात वाजता जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमासाठी ताजमहल हॉटेलमध्ये उपस्थित राहणार आहेत. 26 रोजी दुपारी 12 ते दीड या वेळात इंदिरा डॉक येथे पोर्ट ट्रस्टच्या विकासाचे व नव्या प्रकल्पांचे सादरीकरण तर सायंकाळी शिपींग कॉर्पाेरेशनचे सह्याद्री अथितीगृहात सादरीकरण होणार आहे. माध्यमाशी ते संवाद साधणार असून, त्यातून राजकीय विषय दूर ठेवून पोर्ट ट्रस्ट या विषयावर संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील बदलते राजकीय वातावरण, विधानसभा निवडणुका या पाश्र्वभूमीवर ते चाचपणी करतीलही पण जाहीरपणो मुसाफिरी करणारे गडकरी यावेळी मात्र जाहीर समारंभापासून दूर असणार आहेत. मंगळवारी दिल्ली भेटीवर आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले, ‘त्यांचा राजकीय तसेच पक्षाचा कार्यक्रम ठरलेला नाही.’ (विशेष प्रतिनिधी)