सांगली : साखर कारखाना काढून आपण पाप केले, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना वाटत असेल तर, त्यांनी हडप केलेला कारखाना पुन्हा कमी किमतीत संबंधितांना परत करून पापाचे प्रायश्चित करावे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.शेट्टी म्हणाले की, साखर उद्योगासाठी यापुढे पॅकेज देणार नाही म्हणणाऱ्या गडकरींनी कारखाने व साखर उद्योगातून मिळालेल्या कराचे काय केले, हे जनतेला सांगावे. मागील जन्मी पाप केले म्हणून कारखाना काढला, असेही त्यांनी वक्तव्य केले होते. एक प्रकारे ते कारखानदारांचीच बाजू मांडत आहेत. हे खेदजनक असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.भाजप नेत्यांकडील साखर कारखान्यांची संख्या वाढत असल्याने बहुदा अशी मते व्यक्त होत आहेत. साखर उत्पादन वाढल्यामुळे दराचा प्रश्न निर्माण झाल्याची दिशाभूल करणारी माहिती गडकरी देत आहेत. वास्तविक केंद्र शासनानेच गतवेळी पाकिस्तानसह अन्य देशांमधून मोठ्या प्रमाणावर साखर आयात केल्यामुळे यंदा साखरेच्या दराचा प्रश्न निर्माण केला आहे.एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकºयांना दर देण्यासाठी राज्याची तिजोरी रिकामी करून म्हणून घोषणा करतात आणि त्यांच्याच पक्षाचे केंद्रीय मंत्री गडकरी मात्र साखर उद्योगाला पॅकेज मिळणार नाही म्हणून ठामपणे सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांना साखर उद्योगातील काही कळत नाही, असे गडकरींना वाटत आहे का? कारखाने ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असे ते म्हणत असले तरी, सोन्याची अंडी कारखानदार आणि सरकारच्याच पदरात पडली आहेत. शेतकरी मात्र संघर्ष करीत आहेत. एकरकमी एफआरपीच्या मुद्यावरही आम्ही ठाम आहोत. त्यामुळे येत्या १ जानेवारी रोजी कोल्हापुरात साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत.
गडकरींनी हडपकेलेला कारखाना परत करुन प्रायश्चित करावे - शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 1:07 AM