पुणे : भाषाप्रभू, ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा पोलिसांनी बुधवारी दुपारी मुठा नदीपात्रातून शोधून काढला. संभाजी उद्यानातील हा अर्धपुतळा उखडून संभाजी ब्रिगेडच्या चार कार्यकर्त्यांनी तो नदीत फेकून दिला होता. या चौघांनाही ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘‘ज्यांनी हे कृत्य केले ते आता सापडले आहेत, त्यांची गय केली जाणार नाही परंतु यांचे बोलविते धनी कोण आहेत याची पाळेमुळे खोदून काढली जातील. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नावे असे उद्योग खपवून घेतले जाणार नाहीत,’’ असा सज्जड इशारा दिला आहे.गडकरी यांचा पुतळा मंगळवारी मध्यरात्री संभाजी उद्यानातून काढून नदीपात्रात फेकून दिल्याचा मेसेज व्हायरल झाला होता. त्यानुसार चौघा आरोपींना घेऊन पोलीस दुपारी नदीपात्रात आले. त्यांनी जागा दाखविल्यानंतर पाण्यात उतरून काही वेळात हा पुतळा शोधून काढला. पुतळ्यावर हातोड्याने प्रहार केले असले तरी पुतळा भंगलेला नाही, सध्या पुतळा पोलिसांच्या ताब्यात असून महापालिकेला हवा असल्यास त्यांना न्यायालयाकडे अर्ज करावा लागेल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम यांनी सांगितले. या घटनेमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घ्यायचा असल्याने चारही आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी मुख्य सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयात केली़ त्यानुसार प्रदीप भानुदास कणसे, हर्षवर्धन महादेव मगदूम, स्वप्निल सूर्यकांत काळे आणि गणेश देविदास कारले यांना न्यायालयाने ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपीच्या वतीने अॅड़ मिलिंद पवार, अॅड़ रविराज पवार, अॅड़ सुहास फराडे, अॅड़ विजय शिंदे, अॅड़ विश्वजित पाटील यांनी काम पाहिले़
नदीतून काढला गडकरींचा पुतळा!
By admin | Published: January 05, 2017 5:15 AM