(स्थळ: महाराष्ट्र फूड फेस्टिव्हल. वेगवेगळ्या पक्षांचे नेते स्टॉलवर खाद्यपदार्थाची विक्री करत उभारलेले.)
ग्राहक : नेहमी खाण्यात दंग असणारे नेते आज इतरांना कसं काय खाऊ घालू लागले बुवा?
आबा : (कौतुकानं) आचारसंहिता लागल्यानं आम्ही सारे आता निवांतच ना. तेव्हा आमच्या अजितदादांनी टूम काढली की, ‘प्रत्येकानं आपापली स्पेशल डिश बनवून इथं लोकांना खाऊ घालावी.’
देवेंद्रपंत : आजच्या फूड फेस्टिवलची टूम अजितदादांची कुठली? परवा आमच्या नितीनरावांच्या बंगल्यात बिल गेटस्नी आवडीनं दही-मिसळ खाल्ल्याचं कौतुक बघवलं नाही ना त्यांना. म्हणूनच सा:यांनाच डिश बनवायला लावलीय आज त्यांनी.
तटकरे : (डोकं खाजवत) ‘उध्दों’च्या हातचा माहिम हलवा ‘राज’ला खाऊ घालण्याचा मीही केला होता प्रयत्न. पण काय सांगू ‘महाराज’.. त्या मिठाईला काही शेवटर्पयत चव आलीच नाही बघा.
ग्राहक : (मिश्किलपणो) पण निवडणूक काळात लोकांना खाऊ घालणं, हा सुद्धा आचारसंहितेचा भंगच ना?
भुजबळ : छे.. छे.. त्या बदल्यात आम्ही पैसे घेतोय ना फेस्टिवलमध्ये. जे काही जमतील, त्याचा तेवढाच पुढच्या निवडणुकीला हातभार.
ग्राहक : (डोळे मिचकावत) नाही तरी लोकसभेला म्हणो, बरीच मंडळी पुरती धुऊन निघालीत तुमच्यापैकी.
शेट्टी : ही घ्या आमची भेळ-मिसळ. ‘कोल्हापुरी’ चुरमु:यावर ‘मुंबई’चा फरसाण अन् ‘नागपुरी’ मसाला मारुन तयार केलाय आम्ही. ‘उध्दो’ आले नाहीत म्हणून ‘आदित्य’नं सुचवलीय ही टेस्ट खास.
अजितदादा : (कुत्सितपणो) पण यात ‘गुजराती चाट’ जास्त झाल्यानं मराठी भेळेची टेस्ट पुरती बिघडलीय. त्यापेक्षा आमचे ‘स्पेशल सँडविच’ घ्या. एकदम टेस्टी.
पृथ्वीराज : (डोळे मिचकावत) क:हाडच्या ब्रेडमध्ये बारामतीचं पॅटीस दाबून ठेवून केलेलं ‘दादांचं सँडविच’ एकदम फस्र्टùùक्लास झालंय बघा. वाटल्यास सोबतीला काकांची तिखट मिरचीही ठेवा, तोंडीला.
राज : पण, नाशकातल्या धाब्यावर मीही एक नवीन ‘चटपटा फ्राय’ अॅटम तयार केलाय. ‘छगनरावांची चटणी’ बनवून त्यासोबत मी ‘बारामतीचा सांबर’ देतोय. कमळाक्कानं तयार केलेली इडली मी काकांच्या चमच्यावर फ्राय करुन मिळेल.
राम : (हातातलं शिवबंधन नीट गुंडाळत) जुनीच इडली दरवेळेला गरम करुन देतात ते. विश्वास ठेवू नका बिलकूल त्यांच्यावर. मीच होतो इतके दिवस आत भट्टीवर त्यांच्यासोबत. त्यामुळं मला सारं माहीत.
थोरले काका : तो शिळी देतोय की ताजी, याच्याशी मला काय देणं-घेणं? ‘डिश’पुरती बसायला खुर्ची मिळाली, हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं!
जितेंद्र : बघा माणिकराव.. आमचे काका प्रत्येक गोष्टीत कसा ‘टू इन वन’चा मेळ साधतात. पण, तुमची डिश कुठाय? फेस्टिवल संपायची वेळ झाली की.
माणिकराव : (हळूच दिल्लीच्या दिशेला नजर टाकत) आम्ही कुठली डिश कुणासोबत कशी बनवायची, याची ‘ऑर्डर’ काही अजून ‘वरनं’ आलीच नाही होùù
- सचिन जवळकोटे