- कमलेश वानखेडे
नागपूर : विदर्भाचे पॉलिटिकल सेंटर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय व भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. यावेळी गडकरींच्या विकास पॅटर्नलाच आव्हान देत काँग्रेसकडून माजी खासदार नाना पटोले रिंगणात उतरले आहेत. रिंगणात इतर पक्ष व उमेदवार असले तरी थेट लढत या दोन प्रमुख नेत्यांमध्येच होण्याची चिन्हे आहेत.काँग्रेसचा गड मानला जाणारा नागपूर मतदारसंघ २०१४ मध्ये गडकरींनी पावणेतीन लाखाहून अधिक मतांनी भेदला होता. गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा घेऊन गडकरी यावेळी पुन्हा मैदानात उतरले आहेत. नाना पटोले यांची भिस्त सामाजिक समीकरणांवर आहे. नागपुरात फारसे अस्तित्व नसलेली शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष प्रचाराचे सोपस्कार पार पाडण्यात व्यस्त आहेत.भंडारा-गोंदियातून थेट नागपुरात एन्ट्री घेतलेल्या पटोलेंसाठी नागपूरची रणभूमी तशी नवी आहे. त्यांची भिस्त पूर्णपणे काँग्रेस कार्यकर्त्यांवर आहे. पक्षसंघटनेच्या बळावर भाजपाची शहरात पकड घट्ट आहे तर गटबाजीला त्रासलेला काँग्रेस कार्यकर्ताही नवा पर्याय मिळाल्याने कामाला लागला आहे. आजवर ‘वाड्या‘भोवती फिरणारे काँग्रेस नेते किती निष्ठेने पटोलेंसाठी राबतात यावर बरेच काही ंअवलंबून आहे.नागपूर लोकसभेंतर्गत येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघात गडकरी यांनी आघाडी घेतली होती. या वेळीही आपले मतदारसंघ शाबूत राखण्यासाठी भाजपाचे आमदार कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील स्वत: लक्ष ठेवून आहेत. विधानसभेत काँग्रेसकडून पराभूत झालेले व यावेळी पुन्हा इच्छुक असलेले उमेदवार आपापल्या मतदारसंघाची ट्रायल घेण्यासाठी सज्ज आहेत. बसपाने यावेळी आपले नगरसेवक मोहम्मद जमाल यांना संधी दिली आहे. बसपाला खिंडार पाडत ‘बीआरएसपी’ हा नवा पक्ष स्थापन करणारे अॅड. सुरेश माने रिंगणात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीने प्रदेश सरचिटणीस सागर डबरासे यांच्यावर डाव लावला आहे. या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना रिपब्लिकन मते खेचली तर काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो.कळीचे मुद्देमेट्रो रेल्वे, मिहान, सिमेंट रोड यासारख्या विकासाच्या मुद्यांवर नितीन गडकरी नागपूरकरांना साद घालत आहेत.तर पटोले हे नागपूरचा नव्हे तर भाजपाच्या नेत्यांचा विकास झाला, असा दावा करीत भाजपा नेत्यांना लक्ष्य करीत आहेत.आपण रेकॉर्ड टार्इंममध्ये मेट्रो सुरू केली. आयआयएम, एम्स आणले. मिहानचा विकास झाला. लॉ युनीवर्सिटी आली. नागपूर खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट रोडचे जाळे उभारले. ही फक्त पाच वर्षातील प्रगती आहे. यापूर्वीची १५ वर्षे काँग्रेसचे खासदार होते. त्यांनी काय केले हे जनतेला ठाऊक आहे.- नितीन गडकरी, भाजपामेट्रो रेल्वे, सिमेंट रोड हे विकासाचे मापक आहेत का ? मिहानमध्ये किती युवकांना रोजगार मिळाला ? मेडिकल, मेयोची काय दुर्दशा झाली आहे. डॉक्टर नाही, औषध नाही, मशीन बंद आहेत. स्वच्छतेत नागपूर शहर ५२ व्या क्रमांकावरून ५८ व्या क्रमांकावर का घसरले, यावर सत्ताधाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे.- नाना पटोले, काँग्रेस