नागपूर, दि. 6 - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा ओएसडी म्हणवून घेणारा ठगबाज जिसस वाघाडे याची सोनेगाव पोलिसांनी पुन्हा कसून चौकशी केली.
ओंकारनगरातील रहिवासी असलेल्या वाघाडे याने शासकीय मुद्रा असलेले व्हिजिटिंग कार्ड छापले होते. या कार्डचा वापर करून तो आपण केंद्रीय मंत्री गडकरी यांचा ओएसडी असल्याचे इतरांना सांगत होता. विमानतळ आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी तो या कार्डचा सर्रासपणे वापर करीत होता. नागपूर विमानतळावर 31 जुलै रोजी सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान त्याने अशाच प्रकारे आपले बनावट व्हिजिटिंग कार्ड देऊन तेथील लाऊंजमध्ये आदरातिथ्य घेतले. याचवेळी गडकरी यांचे अतिरिक्त खासगी सचिव अतुल मंडलेकर हे नागपूर विमानतळावरील गो-एअरवेजच्या काऊंटरवर बोर्डिंग पास घेत होते. त्यावेळी तेथील अधिका-यांनी मंडलेकर यांच्याकडे वाघाडेबाबत विचारपूस केली. त्याने दिलेले व्हिजिटिंग कार्डही गो-एअरवेजच्या अधिका-यांनी मंडलेकरांना दाखवले. ते पाहून मंडलेकर यांनी वाघाडेला हे तुमचेच कार्ड आहे का, अशी विचारणा केली आणि वाघाडेची बनवाबनवी उघड झाली. त्यावेळी त्याने चुकीबद्दल क्षमायाचना केली आणि परीक्षेसाठी मुंबईला जायचे आहे, असे सांगितले. त्यामुळे त्याला त्यावेळी जाऊ देण्यात आले.शुक्रवारी या प्रकरणी गडकरींचे ओएसडी सुधीर देऊळगावकर यांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर जिसस वाघाडे याची पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांनी चौकशी सुरू केली. त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर त्याने व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते म्हणून आपण व्हिजीटिंग कार्ड छापल्याची कबुली दिली. शुक्रवारी रात्र झाल्यामुळे पुन्हा चौकशीसाठी शनिवारी हजर राहण्याचे सूचना पत्र देऊन पोलिसांनी त्याला मोकळे केले. शनिवारी दुपारपासून पोलिसांनी त्याची पुन्हा चौकशी सुरू केली. त्याच्याशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे त्याच्याकडून मागवून घेतली. व्हिजिटिंग कार्ड छापणा-याचीही पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर त्याला पुन्हा रविवारी चौकशीसाठी येण्यास सांगण्यात आले. रविवारी रात्रीपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याचे संकेत आहे.