नवी दिल्ली : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला गुरुवारी सँडलने मारहाण करणारे शिवसेनेचे खा. रवींद्र गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यासाठी एअर इंडिया तसेच चार खासगी कंपन्यांनी बंदी घातली आहे. फेडरेशन आॅफ इंडियन एअरलाइन्सच्या सूत्रांनी ही माहिती दिली. ही बंदी उठेपर्यंत खा. गायकवाड यांना विमानाने प्रवासच करता येणार नाही. एअर इंडियाने त्यांचे आज शुक्रवारचे दिल्ली ते पुणे हे परतीचे तिकीटच रद्द केले.कोणत्याच कंपनीच्या विमानाने परतणे शक्य नाही, हे लक्षात आल्यानंतर खा. गायकवाड यांनी दिल्ल्ीहून रेल्वेने मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. ते शनिवारी सकाळी मुंबईत पोहोचल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. खा. गायकवाड यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी मारहाणीचा गुन्हाही दाखल केला आहे. एअर इंडिया आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर हा एफआयआर दाखल करण्यात आला.शिवसेनेचे नेते कालपासून आज सकाळपर्यंत खा. गायकवाड यांनी चूक केल्याचे मान्य करीत होते. मात्र त्यांच्याविरुद्ध एआयआर दाखल होताच, शिवसेनेने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीुमुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप सुरू केला आहे. एवढेच नव्हे, तर पोलिसांनी मला अटक करून दाखवावीच, असा इशारा गायकवाड यांनी दिला. मी माफी मागणार नाही. त्या कर्मचाऱ्याने आधी माफी मागावी. नंतर काय ते पाहू, असे सांगून माझ्याबाबतील शिवसेना पक्षप्रमुखच योग्य तो निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.दिल्लीहून आज दुपारी गायकवाड पुण्याला येणार होते. पण त्यांचे परतीचे तिकीट रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियाने रद्द केले. एअर इंडिया या सरकारी कंपनीने आणि जेट एअरवेज, इंडिगो, स्पाईस जेट आणि गो एअर या चार खासगी विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती फेडरेशन आॅफ इंडियन एअरलाइन्सच्या सूत्रांनी दिली. इंडिगोचे संचालक आदित्य घोष म्हणाले की, या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. शिवसेनेचे सचिव खा. अनिल देसाई यांनी सांगितले की, आपल्या प्रवासाच्या नियोजनात बदल करण्याबाबत गायकवाड यांना सांगण्यात आले आहे. हा तणाव वाढू नये, अशी पक्षाची इच्छा आहे. गायकवाड यांनी शुक्रवारचे एअर इंडियाचे (एआय ८४९) दुपारी चारचे तिकीट काढले होते. गायकवाड यांना विमानात प्रवेश मिळणार नाही, असे एअर इंडियाने त्यांना कळविले.तक्रार आल्यास तपशील पाहूमात्र त्यांच्या वर्तणुकीबाबत लोकसभेत आज चर्चा झाली नाही. लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना कालच्या घटनेविषयी विचारले असता, त्या म्हणाल्या की,ही घटना संसदेच्या बाहेर घडलेली असल्याने सभागृह याची स्वत:हून दखल घेऊ शकत नाही. कोणाची तक्रार आल्यास तपशील घेऊन नंतर पाहू.लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारगायकवाड यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, नागरी उड्डयन मंत्री यांनी पत्र लिहिले आहे. याशिवाय या घटनेची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही दिल्याचे समजते.सभ्यतेची अपेक्षासफाई कर्मचाऱ्यांना विमानाची साफसफाई करायची होती. त्यामुळे त्यांनी (गायकवाड) विमानातून खाली उतरावे, एवढेच मी त्यांना सांगितले. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी सभ्यतेने वागायला हवे, असे मारहाण झालेला एअर इंडियाचा कर्मचारी सुकुमार यांनी सांगितले.खासदाराच्या मुजोरीचा व्हिडिओया घटनेचा एक कथित व्हिडिओ गुरुवारी रात्री समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला. त्यात एअर इंडियाची एक महिला कर्मचारी सहकाऱ्याला मारणे थांबवावे, अशी खासदार गायकवाड यांना विनंती करताना दिसते. यावर गायकवाड ज्याला मारतअसतात त्याला विमानाबाहेर फेकून देण्याची भाषा करतात. असे केले तर तो कर्मचारी मरेल व तुमच्यावर खुनाचा खटला होईल, असे कर्मचारी त्यांना सांगतात. त्यावर गायकवाड, याआधी माझ्यावर अनेक खटले आहेत, आणखी एक झाल्याने काही फरक पडत नाही, अशी बढाई मारत असल्याचेही या व्हिडिओत दिसते.
गायकवाडांना विमानबंदी!
By admin | Published: March 25, 2017 2:58 AM