वापी/ नवी दिल्ली : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सर्व विमान कंपन्यांनी बंदी घातल्यामुळे ते शुक्रवारी आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेसने मुंबईला यायला निघाले खरे; पण मुंबईला येण्याऐवजी त्यांनी वापीला उतरून उस्मानाबादचा रस्ता धरला. ते मुंबईत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार होते. पण ती भेटही कधी होणार, हे अनिश्चित आहे. ठाकरे यांनी भेटीसाठी त्यांना वेळ न दिल्याची चर्चा मुंबईत सुरू होती.प्रसिद्धी माध्यमांचा ससेमिरा टाळण्यासाठीच ते वापीला उतरून उस्मानाबादला निघून गेले, असे सांगण्यात येत आहे. त्यांनी वापी येथे कार मागवून घेतली होती. त्यांच्यासोबत त्यांचे दोन कार्यकर्तेही होते, असे सांगण्यात आले. त्यांनी दिल्ली ते मुंबई टू टायर एसीची तीन तिकिटे आरक्षित केली होती. त्याआधी मथुरा स्थानकावर ते ट्रेनमधून खाली उतरले होते. सोबतच्या कार्यकर्त्याच्या छातीत दुखू लागल्याने आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेस काही काळ मथुरा स्थानकावर थांबवण्यात आली होती. रेल्वेत पत्रकारांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी त्यांची बाचाबाची झाली, असे कळते. खा. गायकवाड यांच्यावर देशातील सर्वच विमान कंपन्यांनी बंदी घातली आहे. पुढील आठवड्यात लोकसभेत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एअर इंडिया आणि ज्यांना मारहाण झाली ते सुकुमार यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी कलम ३0८ व (कलम ३५५ अन्वये खा. गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून, तपास क्राइम ब्रँचकडे सोपविला आहे. (वृत्तसंस्था)गायकवाड यांचे पत्रखा. गायकवाड यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन व नागरी वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांना पत्र लिहून एअर इंडियाच्या सेवेबद्दल तक्रारी केल्या असून, झाल्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे. एअर इंडियाची देशांतर्गत सेवा अतिशय वाईट असून, कर्मचारीवर्गही अत्यंत उद्धटपणे वागतो, असा आरोप त्यांनी केला आहे. वाईट सेवा दिल्यास खासगी कंपन्यांवर कारवाई केली जाते. मग एअर इंडिया कंपनीवर कारवाई का नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.
गायकवाड मुंबईऐवजी उतरले वापीलाच!
By admin | Published: March 26, 2017 3:38 AM