- मनोज गडनीसलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तब्बल ६,६०० कोटी रुपये मूल्याच्या बिटकॉइन घोटाळाप्रकरणात मंगळवारी सीबीआयने महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, कोल्हापूरसह दिल्ली-एनसीआर, बंगळरू अशा ६० ठिकाणी छापेमारी केली. पोलिसांसोबतच आता या प्रकरणाचा तपास सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणा करत आहेत.
मे. व्हेरिएबल टेक प्रा. लि. या कंपनीची स्थापना अमित भारद्वाज (आता हयात नाहीत), अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज यांनी २०१५ मध्ये केली होती. कंपनीच्या गेन बिटकॉइन या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याकाठी १० टक्के परताव्याचे प्रलोभन दाखवणारी योजना मे. व्हेरिएबल टेक प्रा.लि.ने २०१७ मध्ये राबवली. हजारो गुंतवणूकदारांनी त्याला बळी पडत कंपनीच्या योजनेत गुंतवणूक केली होती. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना कंपनीने परतावाही दिला होता. मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांना परतावा देणे थांबविले. कंपनीच्या संचालकांनी देशभरातून गोळा झालेले ६,६०६ कोटी रुपये विविध मार्गांनी स्वतःच्या खात्यामध्ये फिरवले
दुबईत प्रमोशनल इव्हेंटया बिटकॉइनचे प्रमोशन करण्यासाठी कंपनीच्या संचालकांनी दुबईत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिल्लीस्थित इव्हेंट मॅनेजर नितीन गौर याने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ३५ लाख रुपयांच्या आसपास किंमत असलेला एक बिटकॉइन याप्रमाणे ४० बिटकॉइन निखिल महाजनला मानधनापोटी मिळाले होते. गेल्यावर्षी ३ जानेवारीला ईडीच्या मुंबईच्या अधिकाऱ्यांनी नितीन गौर याला दिल्लीतून अटक केली होती.
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रांचीही मालमत्ता जप्तयाच प्रकरणात गेल्यावर्षी १८ एप्रिलला अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा याची ९७ कोटी ७९ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबईतील जुहू येथे शिल्पा शेट्टी हिच्या नावे असलेला फ्लॅट, पुणे येथील बंगला आणि राज कुंद्राच्या नावे असलेले शेअर्स यांचा समावेश आहे. बिटकॉइन घोटाळ्यातून कमावलेल्या पैशांतून कुंद्रा याने ही मालमत्ता खरेदी केल्याचा ईडीचा दावा आहे.
ईडीकडूनही तपासपोलिसांच्या तपासादरम्यान याप्रकरणी मनी लॉड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीनेही तपास सुरू केला होता. ईडीने आतापर्यंत कंपनीच्या मालकीची देशातील आणि परदेशातील मिळून १७२ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत दुबईतील व्यावसायिक संकुलातील जागेचा समावेश आहे तसेच, गेल्यावर्षी कंपनीच्या मालकीच्या तीन आलिशान मर्सिडीज आणि एक ऑडी गाडीही जप्त केली आहे. दुबईप्रमाणेच सिंगापूर आणि हाँगकाँग येथेही कंपनीने घोटाळ्याच्या पैशांतून मालमत्ता खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
नांदेडमध्ये ५०० कोटींची उलाढाल, २०१७ मध्ये दाखल झाला गुन्हा
नांदेड : नांदेडातील अनेक व्यापारी, डॉक्टर आणि उद्योजकांनी २०१७ मध्ये आपल्याजवळील बिटकाॅइन सॉफ्टवेअर प्रति महिना १० टक्के व्याजदर मिळण्याच्या आमिषाने गेन बिटकाॅइनला दिले होते. सुरुवातीला काही महिने गेन बिटकाॅइनने आकर्षक व्याजदरही दिले. नंतर मात्र गुंतवणूकदारांची फसवणूक केली. यात नांदेडातून जवळपास ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आहे. त्यात सीबीआयकडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. २०१७ मध्ये या प्रकरणात नांदेडात पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या प्रकरणात महाराष्ट्र आणि दिल्लीत पोलिसांत अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. गेन बिटकाॅइनचा मुख्य निर्माता अमित भारद्वाज हा या प्रकरणात आरोपी होता. भारद्वाज याने नांदेडात शिक्षण घेतले होते.