लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेचा आर्थिक कणा असलेले जकात कर बंद होत असल्याने पालिकेने उत्पन्नाचे दुसरे स्रोत मानले जाणाऱ्या मालमत्ता कराकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार दिलेल्या मुदतीत मालमत्ता कर भरणाऱ्या मुंबईकरांना त्यात सलग चौथ्या वर्षी सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत दोन ते चार टक्के असणार आहे. या योजनेमुळे मालमत्ता कर वेळेवर भरण्याकडे कल वाढून पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल, असा या मागचा प्रशासनाचा उद्देश आहे.३० जून २०१७पर्यंत अथवा तत्पूर्वी १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांना देयकाच्या रकमेत दोन टक्के , १ आॅक्टोबर २०१७ ते ३१ मार्च २०१८ या काळातील मालमत्ता कर भरणाऱ्यांना देयकाच्या रकमेत चार टक्के सवलत देण्यात येईल. तसेच १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०१७ या काळातील मालमत्ता कर भरणाऱ्यांना देयकाच्या रकमेत एक टक्का, तर १ आॅक्टोबर २०१७ ते ३१ मार्च २०१८ दरम्यान कर भरणाऱ्यांना देयकाच्या रकमेच्या तीन टक्के सवलत देण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. त्यावर पालिकेच्या महासभेचेही शिक्कामोर्तब झाल्यावर तत्काळ अंमलबजावणी सुरू होईल.
वेळेवर कर भरल्यास मिळणार सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2017 3:26 AM