पुणे : माझा मुलगा व मी एकमेकांबरोबर बोलून वेगळे झालो आहोत. त्याला मी विचारले होते, मात्र त्याने सांगितले की मी येणार नाही. मला तिथे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा नव्हता, म्हणून मी शिंदे गटात आलो, असे खासदार गजानन कीर्तीकर यांनी सांगितले.
पुण्यातील शिंदे गटाच्या वतीने कीर्तीकर यांचे त्यांच्या निवासस्थानी शिंदे गटातील प्रवेशासाठी स्वागत करण्यात आले. त्यानंतर कीर्तीकर यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर जाणे पटले नाही. संपलेल्या काँग्रेसला ठाकरे यांच्यामुळे संजीवनी मिळाली. मला खासदारकीची उमेदवारी देऊ नये यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील होते. तरीही मी ते सहन केले. काँग्रेसमधून आलेल्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना खासदार केले यावरून तिथे निर्णय कसे सुरू आहेत ते समजते, असे कीर्तीकर म्हणाले.
तुम्ही निष्ठावान कसे? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारल्यानंतर कीर्तीकर एकदम भडकले. असा प्रश्न कसा काय विचारता, तुमचे शिक्षण झाले आहे का? असा प्रतिप्रश्न केला. मी पब्लिसिटी मिनिस्टर होतो, असे विचारता येणार नाही, असे म्हणत त्यांनी दुसऱ्या प्रश्नांकडे रोख वळविला.