ऑनलाइन लोकमत/ गजानन कलोरे
शेगाव, दि. 31 - शेगावीचा राणा माहेरी निघाला। संगे संत मेळा भजनी रंगला ।। लक्ष लक्ष कंठातूनी गाऊनी अभंग। चंद्रभागा दंग झाली गजानन, गजानन ।। पंढरीत चैतन्याचा मोगरा फुलला ।शेगावीचा राणा माहेरी निघाला।। अशा भक्तीमय गीतांनी भारावलेल्या वातावरणात बुधवारी गजानन महाराजांच्या पालखीने आषाढी यात्रेकरिता पंढरपूरकडे प्रस्थान केले.
गज, अश्वासह हजारो भाविक-भक्तांच्या पायदळ दिंडीसह पालखी सकाळी ७ वाजता मार्गस्थ झाली.
यावेळी ""पालखी निघाली...पालखी निघाली... भक्तांसंगे गजानन माऊली निघाली..."" यासह गजाननाच्या जयघोषाने वातावरण भक्तीमय बनले होते. संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते श्रींच्या रजत मुखवट्याचे व विणेकरी,टाळकरी,वारक-यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी संत गजानन महाराज संस्थानमधून प्रगटस्थळमार्गे नागझरीकडे रवाना झाली.
यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. श्रींच्या पालखीच्या पुजनप्रसंगी विश्वस्त निळकंठदादा पाटील, नारायणराव पाटील, अशोक देशमुख, गोविंदराव कलोरे, अध्यक्ष डॉ, रमेशचंद्र डांगरा, विश्वेश्वर त्रिकाळ, किशोर टांक, पंकज शितूत, चंदुलाल अग्रवाल यांची उपस्थिती होती.
प्रगटस्थळावर श्रींची आरती करण्यात आली. यावेळी मधुकर घाटोळ, एम.पी.पाटील, शरद शिंदे यांच्यावतीने वारक-यांना चहा, फराळाचे वितरण करण्यात आले. नागझरी रोडवर अशोक देशमुख यांच्या मळ्यात वारकºयांना चहा, नाश्ता देण्यात आला.
पाचशे वारक-यांचा सहभाग
श्रींच्या पालखीसह निघालेल्या पायदळ दिंडीत पांढ-या शुभ्र गणवेशात सुमारे पाचशे वारकरी सहभागी होवून शिस्तबद्ध पद्धतीनं मार्गक्रमण करीत आहेत. पालखीसोबत रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व आवश्यक ती वैद्यकीय व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे.