१५पर्यंत मुदतवाढ : रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण
मुंबई : विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र, त्याला प्रतिसादच मिळत नसल्याने, मुदतवाढीचा ‘खेळ’ परिवहन विभागाकडून खेळला जात आहे. आता परिवहन विभागाकडून चौथ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून, अंतिम मुदत ही १५ डिसेंबर असल्याचे सांगितले आहे. याबाबत गुरुवारी गृहविभागाकडून शासन निर्णयच जाहीर करण्यात आला. ही एक वेळची संधी असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील १ लाख ४0 हजार ६५ रिक्षांचे परवाने विविध कारणास्तव रद्द झाल्यानंतर, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये २0 हजार तर इतर क्षेत्रामध्ये १५ हजार सहमत शुल्क आकारून, त्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. १ आॅक्टोबर रोजी घेतलेल्या या निर्णयानंतर नूतनीकरणासाठी ३१ आॅक्टोबर ही मुदत देण्यात आली. मात्र, सतत या नूतनीकरणाला थंड प्रतिसाद मिळत गेल्याने, १६ नोव्हेंबर आणि त्यानंतर ३0 नोव्हेंबर अशी अंतिम मुदत देण्यात आली. ३0 नोव्हेंबरपर्यंत जवळपास १८ हजार परवान्यांचेच नूतनीकरण झाल्याने आणि १ लाख २२ हजार परवाने कायमचे रद्द होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात परवाने रद्द होत असल्याचे पाहता, परिवहन विभागाने एक वेळची संधी म्हणून आता १५ डिसेंबर ही मुदत दिली. ३0 नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरणाला थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी उर्वरित परवाने रद्द झाल्याचे आणि त्यांना पुढील नव्या परवाना लॉटरीत सहभागी होता येणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे परिवहन विभागाचा एकूणच सावळा गोंधळही यातून दिसून आला आहे.