बाळासाहेब बोचरे , खुडूस (जि. सोलापूर)माउलींची पालखी आता पंढरीच्या समीप आल्याचा आनंद आता वारकऱ्यांचा चेहऱ्यावर दिसू लागला आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात, ढगांच्या छायेखाली दिंड्या-पताकांमधून दोन अश्वांचा पाठशिवणीचा खेळ पाहून चैतन्याने फुललेल्या वैष्णवांनी उडीचा खेळ करून अवघ्या परिसरातील भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले़अगदी सकाळचा चहा झाला की चला रिंगणाला, अशी परिस्थिती असलेल्या खुडूसच्या रिंगणात हरिपाठ उरकून ताजेतवाने झालेले वैष्णवजन एकत्र आले होते़ ८़३० वाजता अश्व आले़ ९ वाजता पालखी आली़ तोपर्यंत ज्योतीराम वाघ व जयवंत सीद या शेतकऱ्यांच्या शेतात गावकऱ्यांनी रिंगणाची स्वच्छता केली होती़ समर्थ रंगावलीच्या कलाकारांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या़ पालखीभोवती पताकाधारी नाचत होते, तर टाळकरी, पखवाजवादक रिंगण करून खेळत होते़ चोपदार मंडवी व मालक रिंगणाची पाहणी करत होते़ सर्व औपचारिकता पूर्ण होऊन धावण्याचा इशारा होताच दोन्ही अश्वांनी चौखूर उघळण्यास सुरुवात केली़ पाहता पाहता अवघ्या सोहळ्यामध्ये रोमांच उभे राहिले़या ठिकाणी खेळण्यास जागा चांगली असल्याने रिंगणाच्या खेळानंतर उडीच्या खेळात वारकरी देहभान विसरले़ मनमुराद खेळानंतर दुपारच्या भोजनाला सोहळा निमगाव पारी येथे विसावला़सोमवारी खुडूस येथे माऊलींच्या दर्शनासाठी माजी मंत्री राजेश टोपे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, आ़ प्रणिती शिंदे, माजी महापौर अलका राठोड, बाजार समितीच्या संचालिका इंदमुती अलगोंडा-पाटील आदी उपस्थित होते़
खेळ मांडीयेला... नाचती वैष्णव भाई रे!
By admin | Published: July 12, 2016 3:36 AM