मुंबई : गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाद्यांच्या गजरात काढलेल्या गणेशमूर्तींच्या मिरवणुका व गणेशाच्या आगमनाच्या तयारीसाठी फुललेल्या बाजारपेठा यामुळे सायंकाळनंतर शहर-उपनगरात उत्साहाचे वातावरण दिसून आले.गेले दोन-तीन दिवस गणपतीसाठी किरकोळ बाजाराप्रमाणे घाऊक बाजारातही अशीच तुडुंब गर्दी दिसून आली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत खरेदी सुरू होती. दुकानांमध्येही दिवसभर विविध वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती. कपडे, पूजेची वस्त्रे, पूजेचेसाहित्य, प्रसाद, विद्युत तोरणे, मोदक अशा एक ना अनेकवस्तूंची खरेदी अखंड सुरू होती. आधी खरेदी केलेली असली तरी लाडक्या बाप्पाच्या पाहुणचारात कोणतीही कसर राहू नयेयाच हेतूने गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला अनेकांनी पुन्हा बाजारपेठ गाठली.गुरुवारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना होणार असून, सायंकाळी घरगुती गणपती नेण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र शहर-उपनगरात दिसत होते. दुसरीकडे घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. काही मोठ्या मंडळांनी मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या, तर अनेक मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या. या साऱ्यांचे केंद्र लालबाग, परळ, करी रोड, चिंचपोकळी येथे असल्याने शहरातील मध्यवस्तीतील बहुतांश रस्त्यांवर मिरवणुकांचाच माहोल दिसून येत होता. त्याचबरोबर गणेश चतुर्थीसाठी लागणाºया वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकही मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याने या परिसरातील बाजारपेठा फुलल्या होत्या.दादर, मस्जिद बंदर, लालबाग अशा अनेक रस्त्यांवर दुचाकी लावण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहतूक अडली जात असल्याचे दिसून आले. दुसरीकडे विद्युत रोशणाईने अवघे शहर झळाळून निघाले आहे. उत्सवाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी पोलीस यंत्रणा, महापालिका प्रशासनही सज्ज आहे.मुंबईत ६ हजार सार्वजनिक गणपतीमुंबईत ६ हजार ४५५ सार्वजनिक ठिकाणी, १ लाख ५५ हजार४१४ ठिकाणी घरगुती गणपती तर, ११ हजार ८१३ ठिकाण्ी गौरीची स्थापना होईल. गणेशोत्सव व मुस्लीम बांधवांचा मोहरम शांततेत पार पडावा यासाठी या कालावधीत मुंबईत ५० हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. तसेच ५ हजार सीसीटीव्ही शहरावर नजर ठेवणार आहेत.मुंबई पोलीस दलाच्या मदतीला केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या तुकड्या तैनात आहेत. राज्य दहशतवाद विरोधी विभाग (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस),दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, सशस्त्र पोलीस दल, मुंबई वाहतूक विभाग, होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलही तैनात ठेवण्यात आले आहे.
गणरायाच्या गजराला आजपासून सुरुवात!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 5:24 AM