महाराष्ट्रातगणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक गणेश मंडळांमधून भव्य देखावेही साकारले जातात. या वेळी, गणेशोत्सवानिमित्त हर घर सावरकर समिती आणि महाराष्ट्र सरकार यांनी संयुक्तपणे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित "गणपती आरास" अथवा देखावा स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा राज्य पातळीवर घेतली जाणार असून विजेत्या स्पर्धकांसाठी एकूण पंधरा लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, स्पर्धेसाठी अर्ज करण्याचा कालावधी 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2023 हा आहे. ही स्पर्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडेल.
या स्पर्धेत सावरकरांच्या जीवनातील प्रसंग, कार्य, धैर्य, तेजस्वी व्यक्तिमत्त्व या एक किंवा अनेक बाबींना मूर्त रूपात व्यक्त करणारे देखावे सादर करावयाचे आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेत आपण कौटुंबिक, सोसायटी, मित्रमंडळ, शाळा किंवा सार्वजनिक मंडळे यापैकी कोणत्याही स्तरावर भाग घेऊ शकता.
स्पर्धेत गूगल फॉर्ममधील प्रवेशिकेमार्फत सहभागी होता येईल. या गूगल फॉर्मची लिंक आणि त्याचा QR कोड १९ सप्टेंबरला हर घर सावरकर https://www.facebook.com/HarGharSavarkar/ या फेसबूक पेजवर प्रसिद्ध केला जाणार आहे.