ठाणे, दि. 27 - या वर्षी गणेश चतुर्थी शुक्रवार, २५ आॅगस्ट रोजी आली. परंतु, पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन 19 दिवस उशिराने म्हणजेच गुरुवार, १३ सप्टेंबर २०१८ रोजी होणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.गणेशभक्तांच्या माहितीकरिता त्यांनी पुढील २१ वर्षांतील गणेश चतुर्थीचे दिवस आणि कोणत्या वर्षी कोणता अधिक महिना येणार आहे, त्याची माहितीही दिली. ती माहिती सोशल मीडियावर फिरत आहे.
दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप-
संततधारेने कोसळणा-या पावसाची तमा न बाळगता, दीड दिवसांच्या बाप्पाला नवी मुंबईकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शहराच्या विविध भागांत भक्तिरसात चिंब झालेल्या भक्तांनी दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन केले. महापालिकेच्या माध्यमातून गणेश विसर्जनासाठी त्या त्या विभागांत विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते.शुक्रवारी गणेशाचे घराघरांत वाजतगाजत आगमन झाले. बाप्पाच्या स्वागतला पावसाने जोरदार हजेरी लावली. शुक्रवार सकाळपासून अविरत कोसळणाºया पावसामुळे गणेशभक्तांची काही प्रमाणात गैरसोय झाली. असे असले तरी चिंब पावसाची तमा न बाळगता, भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. शनिवारी दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. वाशी तलाव, कोपरखैरणे, कोपरी तसेच घणसोली गोठीवली, ऐरोली, सानपाडा, नेरुळ, सीबीडी आदी भागांतील तलावात श्रीच्या मूर्तींचे भावपूर्ण वातावरणात व ‘गणपती बाप्पा मोºया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात विसर्जन करण्यात आले.पनवेलमध्ये दीड दिवसाच्या बाप्पाला गणेशभक्तांनी निरोप दिला. विसर्जनासाठी शहरातील तलावात तर ग्रामीण भागात नदीमध्ये गणेशभक्तांनी गर्दी केली होती. पुढच्या वर्षी लवकर या... असे आग्रहाचे निमंत्रण देत बाप्पाला निरोप देण्यात आला. गणपतीचे शुक्र वारी आगमन झाल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. बाप्पाचा मुक्काम घरात चैतन्य निर्माण करणारा ठरतो. त्याचे आगमनच जीवनातील सगळी दु:ख दूर करतो, अशी भावना विसर्जन करण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांनी व्यक्त केली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करीत दीड दिवसांच्या बाप्पाला हजारो भाविकांनी निरोप दिला. ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात शनिवारी विसर्जन करण्यात आले.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याचा फटका विसर्जन कार्याला बसला. विसर्जनाला जाणाºया गणेशभक्तांची मोठी गैरसोय झाली. विशेषत: ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, गोठीवली, कोपरी या भागांतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यातच दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने खड्ड्यांत पाणी साचून त्याचे डबक्यात रूपांतर झाले आहे. अशा खड्डेमय व जलमय रस्त्यावरून श्रीच्या विसर्जनाची मिरवणूक काढताना भक्तांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले.