पुणे : पावसाळ्यात शहरात पडलेल्या खड्ड्यामुळे रस्त्यांची अवस्था वाईट झालेली असतानाच बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यावर मंडपासाठी घेतलेल्या खड्ड्यांमुळे आणखी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा केल्यानंतर मंडळांनी रस्त्यावरील खड्डे स्वत:हून बुजवणे अपेक्षित आहे. परंतु, रस्त्याच्या मधोमध घेतलेले खड्डे अद्याप बुजवले गेले नाहीत. त्यावर पालिका प्रशासनाकडूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येते. पुणे शहराचे वैभव असणारा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळाचे कार्यकर्ते रात्रंदिवस झटतात. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात पुण्याच्या गणेशोत्सवाची चर्चा होते. मात्र, शहरातील काही रस्त्यांचा अर्धा भाग गणेश मंडळांनी घातलेल्या मंडपांनी व्यापला होता. मंडपांसाठी रस्त्याच्या मधोमध खड्डे घेण्यात आले होते. उत्सव संपल्यानंतर रस्त्यावरील मंडप काढण्यात आले आहे. मात्र, रस्त्यावरील खड्डे आजही तसेच आहेत. गणेशोत्सव मंडळांसाठी महापालिकेने मंडप उभारणीबाबत नियमावली तयार केली आहे. सिमेंटच्या रस्त्यावर खड्डे घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, रस्त्यांवर खड्डे घेतलेच, तर ते मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थित बुजवावेत, असे स्पष्ट केले आहे.शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगर परिसरातील काही गणेश मंडळांनी रस्त्यावरील खड्डे बुजवले नसल्याचे दिसून येत आहे. येरवडा, सोमवार पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्त्यासह भारती विद्या भवन विविध ठिकाणच्या रस्यावर खड्डे पडले आहेत. कमला नेहरू हॉस्पिटल जवळील रस्त्यावर एका मंडळाने अर्धवट खड्डे बुजवलेले नाहीत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांचा पाय मुरगळण्याची शक्यता आहे. तसेच पावसाच्या पाण्यामुळे या खड्ड्यांचा आकार वाढू शकतो. त्यामुळे खड्डे तत्काळ बुजवणे गरजेचे आहे. परंतु, पालिका प्रशासन याबाबत गंभीर नाही. परिणामी, नागरिकांना खड्ड्यातून वाट काढतच जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)।नवरात्रोत्सवासाठी मंडप कायम ?पुणे महानगरपालिकेच्या मंडप धोरणानुसार तीन दिवसांच्या आत गणेशोत्सवासाठी उभारलेला मंडप रस्त्यावरून हटवणे आवश्यक आहे. मात्र, उपनगर परिसरातील काही मंडळांनी मंडपांना हातही लावलेले नाहीत. येत्या आॅक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. त्यासाठी हे मंडप कायम ठेवले जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.तात्पुरता मंडप/ स्टेज उभारताना पदपथावर खड्डे घेऊ नयेत. सार्वजनिक ठिकाणी खड्डे घेतल्याचे किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचे आढळून आल्यास पालिका प्रश्नासनाकडून प्रतिखड्डा २ हजार रुपयांप्रमाणे दंड वसूल केला जाईल. मंडप परवानगीची मुदत संपल्यानंतर मंडप, रस्त्यावरील देखावे, विटांमधील बांधकामे अन्य साहित्य रस्त्यावरून तत्काळ हटवावे, असे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण/ अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने तयार केलेल्या ‘पुणे महानगरपालिका- मंडप धोरण २०१५ ’मध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, पालिका प्रशासनाला आपल्याच नियमावलीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. कारण एकाही मंडळावर अद्याप दंडात्मक कारवाई झालेली नाही. ।मंगळवारपर्यंत सर्व खड्डे बुजविले जाणारगणेश मंडळांनी मंडप टाकण्यासाठी घेतलेले सर्व खड्डे येत्या मंगळवारी बुजविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. मंडप खोदाईसाठी घेतलेले खड्डे मंडळांकडून बुजवून घेण्याच्या सूचना अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या प्रमुख संध्या गागरे यांना दिल्या आहेत.- प्रशांत जगताप, महापौर
गणपती गेले; खड्डे राहिले
By admin | Published: September 19, 2016 12:33 AM