सोलापूर – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख(Ganpatrao Deshmukh) यांचे मागील आठवड्यात दीर्घ आजारानं निधन झाले. तब्बल ११ वेळा विधानसभेत निवडून येण्याचा करिष्मा गणपतरावांनी केला होता. सलग ५५ वर्ष ते विधानसभेत सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी आज सोलापूरात जाऊन गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबाची सांत्वन भेट घेतली.
या भेटीनंतर शरद पवारांनी गणपतराव देशमुखांच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले की, माझ्या घरातील सर्व सदस्य शेकाप विचारांचे होते. माझ्या घरी जी वर्दळ असायची ती सर्व शेकापच्या लोकांची असायची. गणपतराव यांचेही येणेजाणे होते. एक अत्यंत निर्मळ मनाचा माणूस, व्यक्तिगत कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांच्या प्रश्नांबद्दल अतिशय काळजी असणारे असे हे व्यक्तिमत्व. महाराष्ट्रातील दुष्काळी भाग, पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाणी या प्रश्नावर अखंड चिंता आणि चिंतन त्यांनी केले. मी १९६७ साली विधिमंडळात आलो, ते माझ्या पाच वर्षे आधी आले असा उल्लेख शरद पवारांनी केला.
तसेच माझ्या मंत्रिमंडळात ते शेती खात्याचे मंत्री होते. मला आठवतंय जेव्हा मंत्रिमंडळाची स्थापना करायची होती, तेव्हा गणपतरावांचे म्हणणे होते की मला मंत्रिपद देऊ नका. शेकाप पक्षाची ताकद रायगड जिल्ह्यात असल्यामुळे तेथील नेते दि. बा. पाटील यांना मंत्रिपद द्या, असा त्यांचा आग्रह होता असंही शरद पवारांनी म्हटलं. ग्रामीण भागातील नागरिकाला दोन वेळच्या अन्नासाठी झगडावे लागू नये, कष्टकऱ्यांचा कायदेशीर अधिकार हे सूत्र आपल्याला आणायचे आहे. त्यासाठी रोजगार हमी योजनेचे धोरण आपल्या सरकारने आणले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. जेव्हा मंत्रिमंडळाची स्थापना झाली तेव्हा रोहयोची जबाबदारी आम्ही गणपरावांकडेच दिली. यासाठी आम्हाला त्यांची समजूत घालून मंत्रिपद द्यावे लागले होते. आज रोहयो योजना देशपातळीवर स्वीकारली गेली आहे. त्याचे सूत्र हे महाराष्ट्रात आणि सोलापूर जिल्ह्यात होते असंही पवार यांनी सांगितले.
दरम्यान, गणपतराव देशमुख यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्यसंपन्न असा नेता मिळणे, हे महाराष्ट्राचे भाग्य होते. व्यक्तिगत सलोखा त्यांनी कधी सोडला नाही. मी मागे लोकसभेसाठी या भागातून उभा राहिलो होतो, तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितले या भागात येण्याची गरज नाही, इथे माझी जबाबदारी आहे. त्यांनी मला इथून मोठा लीड मिळवून दिला होता. गणपतराव देशमुख हे सांगोला जिल्ह्यापुरते मर्यादित नाहीत. तर महाराष्ट्रातील संबंध कष्टकरी, दुष्काळी भागातील जनतेचे ते नेते आहेत. खरंतर मला अंत्ययात्रेला यायचे होते. मात्र संसदेचे अधिवेशनामुळे मला येता आले नाही, याची खंत वाटते. त्यांच्यासारखा व्रतस्थ राजकारणी पुन्हा होणे नाही. त्यांच्या कार्याचे स्मरण कायम राहील अशी खंत शरद पवारांनी बोलून दाखवली.