ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 4 - हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सोमवारी रात्री दादर येथील निवासस्थानी निधन झाले. त्या ८४ व्या वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. किशोरी आमोणकर यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
किशोरीतार्इंचा जन्म मुंबईत १० एप्रिल १९३२ मध्ये झाला. आई व प्रख्यात गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्यामुळे घरातच त्यांना गायनकलेचा समृद्ध वारसा मिळाला होता. वडील माधवदास भाटिया यांनीही त्यांना प्रोत्साहन दिले. ख्याल गायकीबरोबरच ठुमरी, भजन गायनात त्यांनी आपल्या शैलीची मुद्रा उमटवली. मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे पती रवी आमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होते. त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त होत्या. किशोरीताई यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल १९८७ मध्ये पद्मभूषण व २००२ मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. कला क्षेत्रातील मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कारही त्यांना मिळाला होता. किशोरीतार्इंनी १९५० मध्ये कारकिर्दीस प्रारंभ केला. गीत गाया पत्थरोंने (१९६४) या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. मात्र नंतर त्या शास्त्रीय संगीतातच रमल्या. १९९१ मध्ये ‘दृष्टी’ या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले. २०१३ मध्ये राज्य शासनाच्या पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव व अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीतार्इंचे गाणे कसदार झाले. त्यांनी देशोदेशी संगीत कार्यक्रम केले. त्यांनी स्वरार्थरमणी - रागरससिद्धान्त हा संगीत शास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरु ज्जीवित केला, असे मानले जाते.माणिक भिडे, पद्मा तळवलकर, अरूण द्रविड, सुहासिनी मुळगांवकर, रघुनंदन पणशीकर, मीना जोशी, नंदिनी बेडेकर, माया उपाध्याय, किशोरीतार्इंची नात तेजश्री आमोणकर, मिलिंद रायकर, आरती अंकलीकर-टीकेकर यासारख्या प्रसिद्ध गायकांनी किशोरीतार्इंकडून संगीताचे धडे गिरवले. ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘अवघा रंग एकची झाला’, ‘जनी जाये पाणियासी’ ही त्यांची भजने प्रसिद्ध होती. ज्ञानेश्वरीवर आधारित ‘तोचि नादु सुस्वर जाला’ तसेच संत मीराबाईच्या जीवनावर आधारित ‘मगन हुई मीरा चली’ हे त्यांचे कार्यक्रम गाजले. या दोन्ही कार्यक्रमातील सर्व गाण्यांच्या हृदयस्पर्शी चाली तार्इंच्या स्वत:च्या होत्या.प्रत्येकवेळी रागाचे वेगळे अस्तित्व दाखवणे ही किशोरीतार्इंची खासियत होती, अशा शब्दांत त्यांचे शिष्य रघुनंदन पणशीकर यांनी किशोरीतार्इंच्या गायनाचे वैशिष्ट्य सांगितले. किशोरी आमोणकर या असाधारण गायिका होत्या. त्यांच्या निधनामुळे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मला अतीव दु:ख झाले आहे, अशा शब्दांत प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली वाहिली. किशोरीतार्इंच्या जाण्याने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे अपरिमित नुकसान झाले आहे, अशी भावना शंकर महादेवन यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात त्या खूप सुरेख गायल्या होत्या. आज त्या आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. त्या निसर्गाचा चमत्कार होत्या, अशी श्रद्धांजली त्यांच्या शिष्या आरती अंकलीकर-टीकेकर यांनी वाहिली.>युगप्रवर्तक गायिकेचा अस्तकिशोरी आमोणकर यांनी अतिशय कठोर निष्ठेने संगीताची साधना केली होती. त्या खऱ्या अर्थाने गानसरस्वती होत्या. आयुष्यभर व्रतस्थ साधकाप्रमाणे त्यांनी आपले संपूर्ण जीवन संगीताला वाहिले होते. जगात आज फार कमी आदर्श आहेत. किशोरी आमोणकर या भारतातील जवळपास सर्वच गायिकांच्या आदर्श होत्या. अशी ही तेजस्विनी अतिशय शांतपणे भारतीय शास्त्रीय संगीतातून लोप पावली. त्यांच्या जाण्याने भारतीय अभिजात संगीताची अपरिमित हानी झाली आहे.- विजय दर्डा, माजी राज्यसभा सदस्य व चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह >किशोरीतार्इंचे गाणे हे तेजस्वी गाणे होते. संगीतासाठी संगीत त्यांनी गायले. शेवटपर्यंत त्या तत्त्वासाठी जगल्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रेमळ होते. माझ्यावर त्यांचा विशेष लोभ होता. माझे त्यांचे नाते आई-मुलासारखे होते. त्यांच्या निधनाने माझी मोठी व्यक्तिगत हानी झाली आहे, अशी भावना प्रख्यात संतूर वादक सतीश व्यास यांनी अमेरिकेतून ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.किशोरीताई आमोणकर यांच्या निधनाने प्रयोगशीलता आणि संवेदनांना जपणाऱ्या एका ख्यातनाम शास्त्रीय गायिकेला आपण मुकलो आहोत, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली. तर या महान शास्त्रीय गायिकेच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केली.>महान किशोरी आमोणकर आपल्यात नाहीत. भारतीय शास्त्रीय संगीताचे हे मोठं नुकसान आहे. त्यांचे संगीत कायम जिवंत राहील- शंकर महादेवन
The greatest KISHORI AMONKARJI is no more !! A very big loss for Indian Classical Music ! Her music will live on forever— Shankar Mahadevan (@Shankar_Live) April 3, 2017
मला आताच समजलं की किशोरी आमोणकरांचं निधन झालं आहे. हे ऐकून मला खूप दुःख झालं. त्या एक असाधारण गायिका होत्या. त्यांच्या जाण्यानं शास्त्रीय संगीताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ईश्वर त्यांच्या आत्माला शांती देवो- लता मंगेशकर
Mujhe abhi abhi pata chala ki mahan shastriya gayika Kishori amonkar ji ka swargwas hua,ye sunke mujhe (cont) https://t.co/Wwt1852sre— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) April 3, 2017
गानसरस्वती किशोरी आमोणकर गाण्याचे अधिष्ठान होत्या. भारतीय संगीताच्या उंच पातळीवर त्यांनी काम केले, त्या गाण्याचा मूळ विचार होत्या, त्यांच्या निधनाने भारतीय अभिजात गायनाचे पर्व संपले आहे- रघुनंदन पणशीकर विश्वासच बसत नाही आहे की आमोणकर आपल्यात नाहीत, त्यांच्याकडे पाहून आम्ही शास्त्रीय संगीताची वाटचाल केली, श्रुतीचे अवलोकन, मांडणी अभ्यास, एखाद्या रागाकडे विशिष्ट नजरेने पाहणे हे दैवी होते- सावनी शेंडे खूप मोठा धक्का बसला आहे, त्यांच्या सांगीतिक गोष्टी शिकतच आम्ही इथपर्यंत आलो, त्यांना साथसंगत करताना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या- सीमा शिरोडकर, हार्मोनिअम वादक