पुणे : हिंदूंमध्ये मुस्लिमांविषयी द्वेष होता. गांधीजी मुस्लिमांना समान हक्क देण्याची मागणी करीत होते. तळागाळात असलेल्या दलितांना गांधीजींनी सामाजिकदृष्ट्या समानतेच्या पातळीवर आणून ठेवल्यानेही सवर्णांच्या मनात गांधींविषयी द्वेष होता. या दोन कारणांमुळे शिक्षा म्हणून गांधीजींची हत्या करण्यात आली, असे दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. अपूर्वानंद झा यांनी रविवारी येथे सांगितले. हम समाजवादी संस्थाएं या संघटनेतर्फे राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालयामध्ये अखिल भारतीय समाजवादी युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याच्या समारोपापूर्वीच्या सत्रामध्ये झा बोलत होते. ‘गांधीजींचा अखेरचा महिना’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.ते म्हणाले, ‘‘राष्ट्रवाद हा आंतरराष्ट्रीयवादाला सामावून घेणारा असावा. तसा तो नसला, तर संकुचित असेल तर तो पराभूत होतो. आंतरराष्ट्रीयवाद म्हणजे संबंध वाढविण्याची नवी दृष्टी. गांधीवादाची रचनाच आंतरराष्ट्रीयवादाची होती. ज्यामध्ये मुस्लिम नाहीत, तो हिंदुस्थान अपुरा असेल, असे ते मानत. त्यामुळेच ते मुस्लिमांना समान हक्क देण्याची मागणी करीत होते. पाकिस्तानला नैतिकता म्हणून ५५ कोटी रुपये आपण दिले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असुरक्षित असतील तर तो त्या देशाचा पराभव आहे, असे ते म्हणत असत. त्यामुळे पुण्यातील चित्पावन कोकणस्थांनी त्यांना ठार करण्याचा कट फार पूर्वीच आखला होता. तो त्यांनी वैचारिक भूमिका म्हणून अमलात आणला.’’ झा म्हणाले, ‘‘गांधीजींना अनेक विशेषणे चिकटवली गेली. भारतामध्ये गांधींना रामधून गाणारे म्हटले गेले. हल्ली चरखा हे सजावटीचे साधन झाले आहे. गांधीजींची तत्त्वे आपण खुंटीवर टांगून ठेवली आहेत आणि त्यांच्या नावाने आपण भजन करीत आहोत. केवळ भाषण, प्रवचन दिल्याने आपण गांधीवादी होणार नाही.’’ ते म्हणाले, ‘‘गांधीहत्येनंतर या देशात उसळलेली सांप्रदायिक हत्येची नशा १९६१ पर्यंत थांबली. नंतर जबलपूरमध्ये मुस्लिमवस्त्यांवर हल्ले झाले, तेव्हा एकही समाजवादी अश्रू पुसण्यासाठी तेथे गेला नाही. त्यामुळे गांधींचे वारस म्हणविण्याचा अधिकार त्यांनी गमावला आहे.’’
समान हक्काच्या मागणीमुळे गांधीजींची हत्या
By admin | Published: January 23, 2017 3:07 AM