मुंबई : गांधी हे एक गूढ आहे. त्यांचे तत्त्वज्ञान कुठेच लिखित स्वरूपात नाही. तो असा एक माणूस आहे ज्याच्याकडे जग आश्चर्य, कौतुक आणि आदराने पाहते. कुणाही विरोधकांची, लेखकांची, पत्रकारांची ज्याच्यावर टीका करण्याची हिंमत झाली नाही, अशी व्यक्ती आपल्या भारतात होऊन गेली आणि त्यावर मला लिहायला मिळाले याचा मला अभिमान असल्याचे प्रतिपादन ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक आणि लेखक सुरेश द्वादशीवार यांनी मंगळवारी केले.
सुरेश द्वादशीवार यांच्या ‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ या वैचारिक ग्रंथाला यंदाचा ‘केशवराव कोठावळे पुरस्कार’ ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांच्या हस्ते देण्यात आला. केशवराव कोठावळे पारितोषिक समितीने २०१९ या वर्षातील पुरस्कारासाठी द्वादशीवार यांची एकमताने निवड केली. प्रा. उषा तांबे, संजीवनी खेर, श्रीराम शिधये हे या निवड समितीचे सदस्य होते.
सुरेश द्वादशीवार म्हणाले, माझे जीवन हाच माझा संदेश असल्याचे गांधी नेहमी सांगत. गांधींच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसंघर्ष होता. अनेक लोक निशस्त्र होऊन त्या एका माणसाच्या सांगण्यावर मरण्यासाठी रस्त्यावर उतरतात म्हणजे एक किमया आहे आणि ही अजून कळली नाही.द्वादशीवार यांच्या पुस्तकावर मत व्यक्त करताना संजीवनी खेर म्हणाल्या, गांधीजींचा विचार ग्रंथबद्ध नाही. पण त्यात एकसूत्रता आहे. काळानुरूप बदलणाऱ्या त्यांच्या भूमिकेमुळे ते अनेकदा अनाकलनीय वाटतात. गांधीजींवर ज्या ज्या नेत्यांनी, विचारवंतांनी भाष्य केले, त्यांच्या आक्षेपांचे लेखकाने योग्य प्रकारे खंडन केले आहे. त्यासाठी अनेक दाखले आणि तपशील दिले आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फक्त फॉरवडर््स करणाऱ्यांसाठी हा वैचारिक ग्रंथ ठरू शकेल. पुस्तकाची भाषा वृत्तपत्रीय आणि तटस्थ आहे. त्यामुळे गांधीजींचे मोठेपण आणि वेगळेपण अधिक प्रभावी स्वरूपात समोर येते.
आक्षेपांबद्दल दिले स्पष्टीकरणहिंदुत्ववादी, आंबेडकरवादी, समाजवादी(मार्क्सवादी) यांनी गांधींना नेहमी आपले शत्रूच समजले. हिंदुत्ववादीही फाळणीसाठी गांधींना गुन्हेगार ठरवतात. गांधी स्वत:ला सनातनी हिंदू म्हणत असत. शिवाय त्याचवेळी ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ अशी समन्वयाची हाकही देत. विविध धर्मियांसोबत हिंदूही गांधींना आपला नेता मानत. हे हिंदुत्ववाद्यांचे मूळ दुखणे आहे. आंबेडकरवादीही गांधींवर सतत टीका करतात, कारण गांधी त्यांनी कधी समजूनच घेतला नाही. पुणे करारात डॉ. आंबेडकर यांच्यावर गांधींचा कोणताही दबाव नव्हता. गांधींचे उपोषण तर केवळ पाच दिवसांचेच होते. उलट त्याचा फायदा हा झाला की या देशातील सर्व मंदिरे त्या काळी दलितांसाठी खुली झाली. तुम्ही पुणे करार का केला, असा प्रश्न लुई फिशर या चरित्रकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विचारला असता त्यांचे उत्तर होते, ‘या जगात मला समजून घेणारा माणूस फक्त गांधी आहे. त्या माणसाला माझे माणूसपणही कळते आणि सामर्थ्यही कळते.’ असे किस्से द्वादशीवार यांनी गांधींच्या असलेल्या आक्षेपांबद्दल स्पष्ट करताना सांगितले.
‘आदर्श पुस्तकात ठेवायचा नसतो, अनुसरायचा असतो’गांधींच्या संदर्भातील जनमनातील विविध शंकांचे निरसनही द्वादशीवार यांनी केले. सशस्त्र क्रांतिकारकांसंदर्भात गांधींवर होणाºया आक्षेपांना उत्तर देताना द्वादशीवार म्हणाले, वाट चुकलेले देशभक्त असा उल्लेख करणाºया गांधींची या क्रांतिकारकांबाबत भूमिका नेहमीच पालकत्वाची होती. गांधी आदर्श आहेत; पण अनुकरणीय नाहीत, असे नवी पिढी म्हणते. यासंदर्भात उत्तर देताना द्वादशीवार म्हणाले, आदर्श हा पुस्तकात ठेवायचा नसतो तर तो अनुसरायचा असतो. ज्यांना अनुकरण करता येत नाही त्यांनी आपले दुबळेपण मान्य केले पाहिजे.