बुलडाणा/ रामटेक (जि़ नागपूर ) : राजकीय सोयीसाठी महात्मा गांधी यांचे नाव वापरायचे, न्यू यॉर्कमधील पुतळ्याप्रमाणे सरदार पटेलांचा पुतळा उभारण्याची घोषणा करायची आणि प्रत्यक्षात मात्र या थोर पुरुषांच्या विचारांच्या विसंगत कृती करायची हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी रविवारी केली.बुलडाणा आणि नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील जाहीर सभांमध्ये राहुल यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली़ ते म्हणाले, महाराष्ट्र ही शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेली भूमी आहे. इथे फुटीरवादी विचारांना थारा नाही. इथली जनता सुज्ञ आहे. शिवछत्रपतींच्या नावाचा वापर केवळ राजकीय स्वार्थासाठी करणाऱ्यांना चांगले ओळखून आहे. काँग्रेस संपविण्याची भाषा करणाऱ्यांना हे ठाऊक नाही की, काँग्रेस हे वैचारिक संघटन आहे. काँग्रेसच्या काळात सुरू झालेल्या मनरेगा, अन्न सुरक्षा, शिक्षण अधिकार, जमीन अधिग्रहण अशा चांगल्या योजना आता बंद करण्याचे षड्यंत्र रचले जात असून, सामान्यांच्या खिशात जाणारा पैसा आता उद्योगपती आणि कंत्राटदारांच्या खिशात जात असल्याची टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)
गांधीजींचे नाव राजकीय सोयीसाठी - राहुल गांधी
By admin | Published: October 13, 2014 5:46 AM