प्रज्ञा म्हात्रे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : १ जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीचा फटका गणेशमूर्तींनाही बसला असून त्यांच्या दरात वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक फटका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींना बसणार असल्याची माहिती मूर्तिकारांनी लोकमतशी बोलताना दिली. अवघ्या महिनाभरात भाविकांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. यंदा गणेशोत्सव लवकर असल्याने कारखान्यांत मूर्ती वेळेत पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे, तर दुसरीकडे बुकिंगसाठी भक्तांचीही रांग लागली आहे. १ जुलैनंतर मूर्तींचे बुकिंग करणाऱ्यांना जीएसटीचा फटका बसला आहे. दरवर्षी साधारणपणे १० टक्क्यांनी मूर्तींच्या दरात वाढ होत असते. जीएसटीमुळे ही वाढ १५ ते २० टक्क्यांनी झाली आहे, अशी माहिती मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी दिली. ज्यांनी १ जुलैआधी बुकिंग केले, त्यांना जीएसटीचा फटका बसणार नाही. जीएसटीमुळे घरगुती गणेशोत्सवापेक्षा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना फटका बसणार आहे. कारण, मंडळांचे बुकिंग उशिरा सुरू होते, अशी माहिती मूर्तीविक्रेते संतोष निकम यांनी दिली. जीएसटीमुळे वाढलेले पीओपी आणि रंगांचे दर यामुळे दरात वाढ झाली आहे. १००० रुपयांना मिळणाऱ्या मूर्तीचे दर ११०० रुपये झाले आहे. यंदाही गणेशमूर्तींमध्ये बाहुबली फिव्हर, मात्र अद्याप बुकिंग नाहीशिवलिंग खांद्यावर घेतलेल्या बाहुबलीरूपातील गणेशमूर्ती गतवर्षीच्या गणेशोत्सवात दिसून आली होती. परंतु, तिला भक्तांकडून अल्प प्रतिसाद मिळाला होता. यंदा मात्र बैठ्या बाहुबलीरूपातील गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. या वर्षी बाहुबली भाग-२ चित्रपट आल्याने त्या पार्श्वभूमीवर ही मूर्ती बनवण्यात आली आहे. मात्र, तिला अद्याप भक्तांकडून मागणी आलेली नाही. त्यामुळे या वर्षीदेखील बाहुबलीरूपातील मूर्ती फलॉप जाईल, असे बोरीटकर यांनी सांगितले. बैठ्या स्वरूपातील बाहुबली गणेशमूर्ती २ पासून १० फुटांपर्यंत उंचीची आहे, अशी माहिती मूर्तिकारांनी दिली.
गणपती बाप्पावरही आले जीएसटीचे ‘विघ्न’
By admin | Published: July 17, 2017 12:56 AM