बाळासाहेब शिंदे/ ऑनलाइन लोकमत
पारे (सांगली), दि. 10 - हिंदू-मुस्लिम ऐक्याचा नारा देत बामणी (ता. खानापूर) येथील मुस्लिम समाजाने आठव्यावर्षी गणेशोत्सव साजरा करीत परंपरा जपली आहे. गेल्या आठ वर्षांपासून येथील मुस्लिम समाज एकत्र येऊन श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून दररोज दोनवेळा पूजा करीत आहे. एवढेच नव्हे तर, गणेश विसर्जनापूर्वी महापूजाही घातली जाते.
बामणी येथील जहांगीर शिकलगार यांनी २००८ ला पुढाकार घेऊन हिंदू-मुस्लिम गणेशोत्सव मंडळाची निर्मिती करून गणेशोत्सवास प्रारंभ केला. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून मुस्लिम समाजातील भाविक श्री गणेशाची पूजा करतात. दररोज सकाळी व संध्याकाळी आरती, नैवेद्य व दररोज महाप्रसाद असा कार्यक्रम असतो. त्याचबरोबर संगीत खुर्ची, गोणपाट उडी, लिंबू-चमचा अशा विविध स्पर्धाही मुस्लिम समाजातील गणेश भक्त आयोजित करतात. आरतीसाठी मुस्लिम व हिंदू ग्रामस्थही सहभागी होतात. गणेश विसर्जनापूर्वी मुस्लिम समाजाच्यावतीने महापूजाही आयोजित केली जाते.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. गेल्या आठ वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे. या मंडळाचे अध्यक्ष जहॉँगीर शिकलगार, सदस्य खलील शिकलगार, हारुण शिकलगार, शकील शिकलगार, चंदन शिकलगार, सूरज शिकलगार, युनूस मुलाणी, जुबेर मुलाणी, राजू शिकलगार, बशीर मुलाणी, मलिक मुलाणी, ईलाही शिकलगार, अमीर शिकलगार, समीर शिकलगार व वसीम मुलाणी आदी कार्यकर्ते पुढाकार घेतात.