सांगली, दि. 25 - गोटखिंडी येथील झुंझार चौकात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मशिदीमध्ये गणेशोत्सवानिमित्त गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावर्षी इस्लामपूरचे उपअधीक्षक किशोर काळे यांच्याहस्ते व आष्टा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीत आरती झाली. मशिदीमध्ये गणपती प्रतिष्ठापनेचे यंदाचे ३७ वे वर्ष आहे.
येथे १९८० पूर्वी येथील झुंझार चौकातील मोकळ्या जागेमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना होत होती. त्यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने, गणपती कोठे स्थापन करावयाचा, असा प्रश्न उपस्थित झाला. यावेळी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून दरवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना मशिदीमध्ये केली जाते. ही परंपरा आजही कायम आहे.
मुस्लिम बांधव दररोज एकत्रित येऊन गणपतीची आरती करतात. येथील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित उत्सव साजरे करतात. १९८२ मध्ये मोहरम व गणेशोत्सव एकाचवेळी आल्याने एकाच ठिकाणी गणेशमूर्ती व पीर पंजाची स्थापना करण्यात आली होती. गोटखिंडीत मशिदीत साजरा होणारा गणेशोत्सव हिंदू-मुस्लिम ऐक्याचे व सामाजिक सलोख्याचे दुर्मिळ उदाहरण ठरले आहे. २०१६ साठी या मंडळाला जिल्हा पोलिस विभागाकडून ‘जातीय सलोखा’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश फाळके, उपाध्यक्ष सचिन शेजावळे, सचिव राहुल कोकाटे, जिल्हा परिषद सदस्या राजश्री एटम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लालासाहेब थोरात, अॅड. अर्जुन कोकाटे, विनायक पाटील, सागर डवंग, वैभव कोकाटे, राजेंद्र पाटील, रामचंद्र घारे, दस्तगीर इनामदार, रफीक मुलाणी, सलीम लेंगरेकर, महंमद पठाण, मज्जीद जमादार, लतीफ लेंगरेकर, पवन पाटील, दीपक पाटील, प्रमोद जाधव, हणमंत जाधव, प्रवीण थोरात, अमोल थोरात, प्रशांत थोरात, महेश जाधव, रहिम जमादार, लखन पठाण, गब्बर इनामदार, अवधूत शिंगटे, अंकुश जाधव उपस्थित होते.
ईदला केवळ नमाजपठणया गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी मुस्लिम बांधवांचा ‘बकरी ईद’ हा सण येत आहे, पण येथील मशिदीतील गणपतीचे विसर्जन अनंतचतुर्दशीला बाराव्या दिवशी होणार आहे. त्यामुळे बकरी ईददिवशी फक्त नमाजपठण केले जाईल, ईदची कुर्बानी गणेशोत्सवानंतर केली जाईल, असा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.