रत्नागिरी : धीरज साटविलकर याने केरळच्या ‘मनोरमा’ वाहिनीवरील ‘उज्वल उग्रणम्’ कार्यक्रमात गणेशगीताच्या तालावर अवघ्या १२ मिनिटात गणेशमूर्ती साकारल्याने त्याची पुढील फेरीसाठी निवड झाली आहे. मल्याळम् वाहिनीवर अवघ्या बारा मिनिटात गणेशमूर्ती साकारणारा धीरज पहिला मराठी युवक आहे. जन्मत: दोन्ही हातांची वाढ खुंटली, शिवाय एका पायाने अपंग असतानाही धीरज साटविलकर हा हैद्राबाद, केरळमधील ‘मनोरमा’ वाहिनीच्या गणेशमूर्ती रेखाटन स्पर्धेत जिद्दीने सहभागी झाला होता. धीरजने ‘देवा श्री गणेशाच्या’ तालावर गणेशमूर्ती साकारली. या कार्यक्रमासाठी ‘बाहुबली’ फेम कलाकार उपस्थित होते. धीरजने उत्कृष्ट गणेशमूर्ती साकारल्यानंतर वाहिनीतर्फे तब्बल चार किलोची पुष्पवृष्टी करण्यात आली. दिवाळीच्या दोन दिवसानंतर ‘उज्वल उग्रणम्’ कार्यक्रम सादर करण्यात आला. धीरजची जिद्द तसेच गणेशमूर्ती साकारण्याच्या कलेकडे पाहून उपस्थित रसिकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात धीरजचे अभिनंदन केले. आता या चॅलेंजची पुढील फेरी पंजाब येथे होणार आहे. धीरजला यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा अपंग कल्याण पुरस्कारदेखील मिळाला आहे. यापूर्वी ‘झी तेलगू’ वाहिनीच्या बिग सेलिब्रेटी चॅलेंजमध्येही धीरजने सादरीकरण केले आहे. काही वर्षांपूर्वी ‘मराठी पाऊल पडते...’मध्ये चमकलेल्या धीरजला ही नवी संधी हैद्राबाद व केरळमधील वाहिन्यांनी दिली आहे. ‘मराठी पाऊल’मुळे त्याला ‘झी तेलगू’ वाहिनीने सेलिब्रिटी चॅलेंजसाठी बोलावले. भारतातील अनेक नामवंत कलाकार यामध्ये सहभागी झाले आहेत. धीरज सध्या रत्नागिरीतील कीर विधी महाविद्यालयात शिकत आहे. आई रोहिणी व वडील राजेंद्र यांचे सततचे प्रोत्साहन व आपण घेतलेली मेहनत यामुळेच हे यश मिळत असल्याचे धीरज याने नम्रपणे सांगितले. (प्रतिनिधी)
४बिग सेलिब्रेटी, ‘उज्वल उग्रणम’ मध्ये मिळवले यश. ४चॅलेंजची पुढची फेरी पंजाबमध्ये होणार. ४हैदराबाद व केरळमधील वाहिन्यांनीही दिली संधी. ४आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच यश मिळते : धीरज. ४सध्या धीरज घेतोय कीर विधी महाविद्यालयात शिक्षण. ४सेलिब्रिटी चॅलेंजमध्ये अनेक नामवंत कलाकार सहभागी.