मुंबई : राज्यभरात वाजतगाजत मोठ्या जल्लोषात गणरायाला निरोप देण्यात आला. मुंबईत २२ तर पुण्यात २४ तासांहून अधिक काळ विसर्जन मिरवणुका सुरू होता. विसर्जनादरम्यान विविध ठिकाणी २५ जणांचा बुडून मृत्यू झाला. नवी मुंबईत सीवूडमध्ये मूर्तीचा वरचा भाग लागून उच्च दाबाची वीजवाहिनी तुटली. या वाहिनीचा जोरदार धक्का बसून ७ जण जखमी झाले. भुसावळमध्ये नाचताना हृदयविकाराचा झटका आल्याने एक युवक मरण पावला.
पुणे जिल्ह्यात ४ तर नाशिक जिल्ह्यात दोघे बुडाले. बुलडाणा, अकोला व चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा बुडून मृत्यू झाला. तर पंढरपूरमध्ये चंद्रभागेत एक युवक मरण पावला. नांदेडच्या नगीनाघाट येथे तीन युवक वाहून गेले. तिघेही उत्तर प्रदेशातील असून ते बांधकाम मजूर होते. हदगाव तालुक्यातील तामसा येथे शशिकांत कोडगिरवार याचा खाणीत बुडून मृत्यू झाला. विदर्भात ८ जणांचा अंत झाला. अमरावतीत ५ बुडाले. भातकुली तालुक्यातील पूर्णा नदीत ४, तर वरूड तालुक्यातील धनोडीच्या तलावात एक जण बुुडाला.कोकणात राजापूर तालुक्यात तिघे बुडाले. कुलदीप वारंग, हृतिक भोसले व सिद्धेश तेरवणकर अशी त्यांची नावे आहेत. ठाण्यात कसारा येथे कुंडण धरणपात्रात तोल जाऊन १५ वर्षांचा मुलगा बुडाला. अहमदनगर जिल्ह्याच्या उक्कलगाव (ता़ श्रीरामपूर) व जोहरापूर (ता़ शेवगाव) येथेही दोन तरुण बुडून मरण पावले. भुसावळ येथील माजी नगरसेवक शांताराम इंगळे यांचा मुलगा उमेश यांच्यावर मिरवणुकीत सशस्त्र हल्ला करण्यात आला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.पूरग्रस्तांबद्दल माणुसकीची भावनामुंबईत शुक्रवार सकाळपर्यंत विसर्जन सुरू होते. पुण्यातील विसर्जन सोहळा २४ तासांनंतर संपला. सांगली, कोल्हापूरमध्ये महापुराच्या नुकसानीतून पुन्हा उमेदीने उभे राहण्याची शक्ती दे, अशी साद घालत पूरग्रस्तांबद्दल संवेदनशिलता दाखवून अत्यंत साधेपणाने गणरायाला निरोप दिला.