गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. कोरोनाकाळानंतर यंदाचा गणेशोत्सव ठिकठिकाणी धूमधडाक्यात साजरा होणार यात शंका नाही. जागोजागी बसलेले गणपती बाप्पा, त्यांच्या दिमाखदार मूर्ती आणि आरास पाहण्यासाठी लोकांची गर्दी होणार, अनेक ठिकाणी, अनेक जण तर रात्ररात्र गणपती पाहण्यासाठी घालवणार हेही उघडच आहे.
समजा एखादा दिवस म्हणजे एखादी पूर्ण रात्र तुम्ही गणपती पाहण्यात घालवली, त्या रात्री तुम्हाला झोपायलाही मिळालं नाही, शिवाय दुसऱ्या दिवशी पुन्हा ड्यूटीवर जायचं आहे, आपली नेहमीची कामं करायची आहेत, अशी वेळ आली तर काय कराल? रात्रभर जागून पुन्हा दुसऱ्या दिवशी झोप न घेता, अखंडपणे काम करणं तसं चूकच, शक्यतो ते टाळाच; पण यदाकदाचित असा प्रसंग आलाच, तर काय कराल?
एखाद्या दिवशी कमी झोप घेतली किंवा झोपच घेतली नाही, तर त्याचे दुष्परिणाम लगेचंच दिसायला लागतात. आळस येतो, अचानक डोळे मिटतात, आपल्या संवेदना शिथिल होतात, न झोपायचा प्रयत्न केल्यानं बऱ्याचदा आपण काय करतो आहोत, हेही आपल्याला कळत नाही. आपल्या प्रतिक्रिया अतिशय स्लो होतात, त्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता असते; पण हे दुष्परिणाम टाळायचे असेल, तर एक छोटीशी डुलकी काढा. ही डुलकी दहा-पंधरा मिनिटांचीही असू शकते; पण त्यापेक्षा जास्त म्हणजे साधारण तासभर तुम्ही झोपलात, तर मात्र तुम्हाला गरगरल्यासारखं वाटू शकतं, चक्कर येऊ शकते. एखादी कडक कॉफी घ्या किंवा कॉफी असलेलं एखादं पेय घ्या. कॅफिनचा प्रभाव जाणवायला साधारण अर्धा तास लागेल; पण सुमारे तीन ते चार तास त्याचा प्रभाव राहू शकताे. त्यामुळे ठराविक काही तासांनी तुम्ही कॉफी घेतली तर कामातला तुमचा परफॉर्मन्स तुम्ही बऱ्यापैकी चांगला ठेवू शकाल.
झोप येऊ द्यायची नसेल, तर प्रखर उजेडाचे दिवे सुरू ठेवा. एकाच ठिकाणी शांतपणे बसून राहू नका. दर थोड्या वेळानं उठा, आपलं शरीर चालतं-फिरतं ठेवा. त्यामुळे तुमचा मेंदू कार्यरत राहील. मुख्य म्हणजे अशावेळी शक्यतो एकच काम करा. मल्टिटास्किंग करू नका. कारण कमी झोप झालेली असल्यमुळे तुमच्या मेंदूची कार्यक्षमता कमी झालेली असते. अशावेळी मल्टिटास्टिंग करणं आपल्या मेंदूला झेपत नाही.