मुंबई-गोवा रस्त्याची हालत १५ हजार कोटी रुपये खर्चूनसुद्धा खराब असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सालाबादप्रमाणे यंदाही गणेशभक्तांना टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. परंतू, ही टोलमाफी वेळेवर मिळणार का, असा सवाल गणेशभक्तांकडून विचारला जात आहे.
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी अशीच महिना-दोन महिने आधी गणेशभक्तांना टोलमाफीची घोषणा केली होती. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी राज्य शासनाने जीआर काढला होता. यामुळे अनेक वाहनचालकांना बिनापासच टोल भरत जावे लागले होते. यंदा त्याहून वेगळी परिस्थिती असण्याची शक्यता फारच कमी आहे.
कारण गणेश चतुर्थी यंदा १९ सप्टेंबर, मंगळवारी येत आहे. यामुळे गणेशभक्त कोकणात १५ सप्टेंबर, शुक्रवारपासूनच जायला सुरुवात करणार आहेत. सोमवारी, १८ सप्टेंबरलाच हरतालिका आहे. यामुळे कोकणात जाणारे गणेशभक्त शुक्रवार दुपारपासूनच गावी जाण्यासाठी निघणार आहेत. यामुळे जर सरकारने पास वेळीच जारी केले नाहीत तर या सर्वांना टोल भरत जावे लागणार आहे.
सरकारचा निर्णय जरी दिलासा देणारा असला तरी तो उशिराने जाणाऱ्या मोजक्या वाहनचालांकान फायद्याचा ठरणार आहे. यामुळे राज्य सरकारने १३, १४ सप्टेंबरपासूनच आरटीओकडून पास देण्यास सुरुवात करावी अशी मागणी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पुण्यातील गणेशभक्तांकडून होत आहे.
मोफत एसटी बसही...
महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोफत एसटी प्रवास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 12 ते 18 मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत. ट्रेन तीन महिने आधीच फुल झालेल्या आहेत. यामध्ये प्रचंड अनागोंदी झाल्याचा आरोप सध्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यामुळे गणेशभक्तांना एसटी बसचाच काय तो आधार असणार आहे.