पुणे : संपूर्ण महाराष्ट्रभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन पूर्ण झाले आहे. यावेळी पुणेकरांनी मोठ्या संख्येने बाहेर पडत लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला. महत्वाचे म्हणजे यंदा मिरवणूक लवकर संपेल असा मंडळांतर्फे व्यक्त करण्यात आलेला आशावाद फोल ठरला असून यंदाही सर्वसाधारणपणे पावणे आठ तास मिरवणूक चालल्याचे बघायला मिळाले.
दरवर्षीप्रमाणे मंडई येथील टिळक पुतळ्यापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी महापौर मुक्ता टिळक यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट आणि इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी विविध इमारतींवरून बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती.ढोलपथकाच्या गजरात आणि चांदीच्या पालखीत बाप्पा विराजमान होऊन टिळक पुतळ्यापासून मिरवणुकीस सुरुवात झाली आणि सर्वत्र पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष झाला. कसबा गणपतीच्या मिरवणुकीत नागारखान्यासह आर्ट ऑफ लिव्हिंग, कामायनी विद्यार्थ्यांचे पथक आणि रमणबाग, रुद्रगर्जना, शिववर्धन आणि प्रभात बँड पथक यांचे वादन आणि सादरीकरण झाले.
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीसुद्धा आपली परंपरा राखून चांदीच्या पालखीतून मिरवणुकीत सहभाग नोंदवला. या मिरवणुकीत शिवमुद्रा, ताल ही ढोलपथके सहभागी झाली होती. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाने फुलांच्या आकर्षक सजावट केलेल्या रथातून मिरवणुकीला सुरुवात केली. त्यांच्यासोबत नादब्रह्म, गर्जना ही ढोल पथके सहभागी झाली होती.मानाचा चौथा तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती शेषनागरथात विराजमान झाला होता. गजलक्ष्मी, हिंद तरुण मंडळ,स्वरूपवर्धिनी पथके सहभागी झाली होती. मानाचा पाचवा केसरीवाडा या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा रथावर साडेनऊ फुटांचा लोकमान्य टिळकांचा पुतळा ठेवण्यात आला होता. त्यांच्यासोबत सनई-चौघडा, श्रीराम पथक सहभागी झाले होते.