मुंबई : गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी गणेशभक्त ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ अशी विनवणी विघ्नहर्त्याला निरोप देताना करीत असतात. या वेळी गणेशभक्तांची ही प्रार्थना बाप्पाने ऐकली आहे. पुढच्या वर्षी गणपतीबाप्पाचे आगमन अकरा दिवस अगोदर म्हणजे सोमवार २ सप्टेंबर, २०१९ या दिवशी होणार असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.सोमण म्हणाले की, काही जणांचा गणेशमूर्ती विसर्जन कृत्रिम तलावात करण्यास विरोध आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन वाहत्या पाण्यातच करावे, असे त्यांचे म्हणणे आहे, परंतु ते योग्य नाही. शास्त्र सांगते की, गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान्ह काळी नदीकाठी किंवा शेतात जाऊन तेथे मातीची गणेशमूर्ती तयार करायची व तिची पूजा करून नदीत विसर्जन करायची, हे ज्या काळात सांगितले गेले, त्या काळात लोकसंख्या व गणेशमूर्तींची संख्याही कमी होती, तसेच त्या काळी मातीच्याच मूर्ती केल्या जात होत्या. आता शुद्ध पाण्याच्या नद्याही नाहीत आणि मूर्तीही मातीच्या नाहीत. त्यामुळे प्रदूषित पाण्यापेक्षा कृत्रिम तलावातील शुद्ध पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करणे योग्य होईल, तसेच विसर्जन मिरवणुकीत डी. जे. डॉल्बी किंवा मोठ्या आवाजाचे ध्वनिवर्धक वापरू नयेत, जलप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावयास हवी आहे.
पुढच्या वर्षी विघ्नहर्त्याचे आगमन ११ दिवस लवकर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 6:22 AM