मुंबई - गेली दोन वर्षे गणेशोत्सवासह सर्वच सण कोरोनाच्या छायेत अनेक निर्बंधांसह साजरे करावे लागले होते. मात्र यावर्षी गणेशोत्सव, दहीहंडी नवरात्र कुठल्याही निर्बंधांविना धुमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर्षी गणेशोत्सव आणि दहीहंडीवर कुठलेही निर्बंध नसतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आता निर्बंधमुक्त सण होणार असतील तर गणेशोत्सवात गणेशमूर्तींची उंची आणि दहीहंडीचे थर याबाबत काय नियमावली असेल, अशी विचारणा केली असता, त्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, यावर्षी गणेशमूर्तींच्या उंचींसाठी कुठलीही मर्यादा नसेल. तसेच दहीहंडीबाबत सांगायचं झालं तर दहीहंडीच्या थरांच्या उंचीबाबत गोविंदांनी न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. कोरोनाकाळात गणेशमूर्तींसाठी घरगुती गणपतींची मूर्ती दोन फूट आणि सार्वजनिक गणपतींची उंची ४ फूट एवढी मर्यादित करण्यात आली होती. मात्र आता मुख्यमंत्र्यांना गणेशमूर्तींच्या उंचीवरील मर्यादा हटवल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा उंच गणेशमूर्ती घडवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, कायदा सुव्यवस्था राखून सण साजरे व्हावेत, यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच गणेशोत्सवात कोकणामध्ये जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच खासगी वाहनाने जाणाऱ्या गणेशभक्तांना दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवात टोलमाफी दिली जाईल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.