अरुण लिगाडे
सांगोला (जि. सोलापूर) - मणेरी गल्लीतील हिंदू - मुस्लीम बांधवांनी सन १९७८ साली एकत्र येऊन महिमकर वाड्यात चहाच्या बॉक्समध्ये साईनाथ गणेश मंडळातर्फे मूर्तीची प्रतिष्ठापना करून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या उत्सवाला तब्बल ४६ वर्षे झाली आहेत. आजही हिंदू-मुस्लिम बांधवांकडून येथे गणपतीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव काळात आरती, पूजा, धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धेसारखे विविध उपक्रम घेऊन एकोप्याने उत्सव साजरा केला जातो.
मंडळाने जपली परंपरा मणेरी गल्लीतील प्रकाश काळे व शरद काळे यांच्या मार्गदर्शनात १९७८ साली सुभाष निंबाळकर, हरिदास जगताप, शिवा फडके, भारत महिमकर तसेच पप्पू मणेरी, सिकंदर मणेरी, ईलाही मणेरी, अस्लम मणेरी यांनी एकत्र येऊन महिमकर वाड्यात पहिल्या बाल गणेश मंडळाची स्थापना केली होती.
त्याकाळी प्रसारमाध्यमे व करमणुकीची साधने नसल्यामुळे गणेश मंडळातील सदस्य विविध वेशभूषा साकारून सजीव देखावे सादर करून करमणूक करीत होते. यापुढेही ही परंपरा अखंडितपणे चालू ठेवल्याचे सिकंदर मणेरी व मधुकर महिमकर यांनी सांगितले.