यंदा गणेशोत्सव मिरवणुकांना परवानगी नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 07:37 PM2020-06-18T19:37:31+5:302020-06-18T19:48:10+5:30

ह्यावर्षी गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ न देता आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे..

Ganeshotsav processions are not allowed this year, informed Chief Minister Uddhav Thackeray | यंदा गणेशोत्सव मिरवणुकांना परवानगी नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती

यंदा गणेशोत्सव मिरवणुकांना परवानगी नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती

Next
ठळक मुद्देपुण्यातील मानाच्या व प्रमुख गणेश मंडळांच्या अध्यक्षांसोबत ऑनलाईन बैठक

पुणे : गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ न देता आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे. यंदा मिरवणुका न काढता दहा १० दिवस आरोग्यदृष्टया मंडळांनी काम करायला हवे. पालखी सोहळ्याप्रमाणे यंदा गणेशोत्सवात मिरवणुकांना देखील परवानगी देणे शक्य नाही. गणेशोत्सव साधेपणाने म्हणजे नेमका कसा, याविषयी मार्गदर्शक तत्त्वे आपण ठरवायला हवी. ती तत्वे ठरवून त्यावर चर्चा करुन पुन्हा बैठक घेऊन अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब करु, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणेश मंडळांच्या अध्यक्षांसमवेत मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव होणार की नाही, हा संभ्रम सगळीकडेच आहे. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी शासन निर्णयानुसार व लोकहित लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आश्वासन दिले. लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथील झाल्यानंतर पुण्यातील इतरही गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करुन उत्सवाची अंतिम रुपरेषा ठरविली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, यंदा कोरोना आणि पाऊस अशा दोन आघाडयांवर आपल्याला लढाई लढायची आहे. उत्सवाची परंपरा कायम ठेऊन स्वरुपात बदल करावे लागतील. प्रत्येकाने आपापल्या घरातून गणरायाचे पूजन करावे, अशी जागृती आपल्याला करावी लागले. अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न आपल्याला करायला हवा. लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणपती भवन येथील इमारतीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मानाच्या व प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांनी संवाद साधला. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, पुनीत बालन, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, नितीन पंडित, अनिरुद्ध गाडगीळ, अ‍ॅड.प्रताप परदेशी, शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, प्रशांत बधे यावेळी उपस्थित होते.

-------

कोरोना विषाणुचा प्राद्रुर्भाव वाढत असताना महाराष्ट्र शासन, पोलीस व आरोग्यसेवक उत्तमरितीने काम करीत आहेत. शासन जो निर्णय देईल त्यानुसार आम्ही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करु. गणेशोत्सव मंडळे ही शासनासोबत आहेत. यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाचे पाच व प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी देखील मंडळांचे अभिनंदन केले आहे. 

- अशोक गोडसे

-----

शासन निर्णयानुसार व लोकहित लक्षात घेऊन आरोग्यदायी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. पुण्यातील प्रमुख मंडळांची मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा झाली आहे. यापुढील काळात पुण्यातील इतर गणेशोत्सव मंडळांसोबत चर्चा करुन एकत्रितपणे साधेपणाने व निर्विध्नपणे उत्सव कसा करता येईल, यादृष्टीने काम करण्याचे त्यांनी सांगितले. या रुपरेषेविषयीचे निवेदन पालकमंत्री अजित पवार यांना देणार आहे.

- अण्णा थोरात

 

Web Title: Ganeshotsav processions are not allowed this year, informed Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.