ठाणे : म्हाडाची बनावट कागदपत्रे तयार करत तसेच अधिकाऱ्यांच्या नावाचे रबरी स्टॅम्प वापरून ती नागरिकांना देत साडेबारा लाखाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा नौपाडा पोलिसांनी पर्दापाश केला आहे. या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. सुहास पाटील, प्रणव पाटील, दीपेश आंगणे आणि प्रीतम पाटील अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. सुहास याने भार्इंदर येथे राहणारे लक्ष्मण पालकर (४१) यांना त्यांचे मित्र जगन्नाथ देसाई यांच्या ओळखीच्या म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगून सुहास याने पालकर यांना ताडदेव येथे म्हाडाच्या रोझा महलमध्ये गाळा मिळवून देतो सांगितले. तर २००६ ते २००७ दरम्यान त्यांच्याकडून तब्ब्ल १२ लाख ५० हजार घेत त्यांना म्हाडा अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरींचे कागदपत्रे देत फसवणूक केली. त्यातच पालकर यांना सुहास हा ठाण्यातील हरी निवास सर्कल येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांना दिली. त्यानुसार नौपाडा पोलिसांनी सुहास याच्यासह प्रणव, दीपेश आणि प्रीतमला ताब्यात घेऊन चौकशी केली. घंटाळी मंदिर येथे त्यांनी तात्पुरते कार्यालय उघडून तेथे म्हाडाची बनावट कागदपत्रे तयार केल्याची कबूली दिली. या कार्यालयातून म्हाडाचे लोगो असलेले बनावट कागदपत्रे, म्हाडा अधिकाऱ्यांच्या नावाचे रबरी शिक्के, म्हाडाची घरे वाटप यादी जप्त केली. (प्रतिनिधी) >डायरीत फसवणूक झालेल्यांची नावे टोळीचा म्होरक्या असलेला सुहास हा २००६ पासून म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगून घराचे आमिष दाखवत नागरिकांना लुबाडत आहे. त्याने अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले असून त्याने सुरू केलेल्या कार्यालयात एक डायरी सापडली. यामध्ये अनेक नागरिकांच्या नावाची यादी असल्याचे पोलिसांनी सांगितले.>आमिषाला बळी पडू नका ‘म्हाडा’चे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून कुणी पैसे मागितल्यास अशांना पैसे देऊ नका. त्यांच्यापासून सावध राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बनावट कागदपत्रे बनवणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2016 5:24 AM