सांगली : राज्यातील विविध जिल्हे तसेच परराज्यांतून आलिशान चारचाकी वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मंगळवारी यश आले. टोळीतील सहाजणांना अटक केली आहे. त्यातील सर्वजण कोल्हापुरातील आहेत. त्यांच्याकडून विविध कंपन्यांची सात वाहने जप्त केली आहेत. त्यांची किंमत ५५ लाख रुपये आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली.अटक केलेल्यांमध्ये युसूफ युनूस जमादार (वय २९, जवाहरनगर, कोल्हापूर), हबीब रहिमतुल्ला गडकरी (३६, लक्ष्मी कॉलनी, टेंबलाईवाडी, कोल्हापूर), महंमदअली ऊर्फ इरफान हबीब काझी (२५, शाहूमिल कॉलनी, बी वॉर्ड, कोल्हापूर), अल्ताफ बाबासाहेब मुलाणी (३०, सरनाईक वसाहत, कोल्हापूर), रियाज रफीक शेख (३०, बी वॉर्ड, सरनाईक वसाहत, कोल्हापूर) व इसाक खुदबुद्दीन मुजावर (४०, सुभाषनगर, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. यातील युसूफ जमादार यास सहा महिन्यांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषणने अटक केली होती. त्याच्याकडून चोरलेली चार वाहने जप्त केली होती. चौकशीत त्याच्या साथीदारांची नावे निष्पन्न झाली होती; पण त्याला अटक झाल्याचे समजताच त्याच्या साथीदारांनी पलायन केले होते. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी साथीदारांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. गुन्हे अन्वेषणचे पथक शंभरफुटी रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी युसूफ जमादार, हबीब गडकरी व महम्मदअली काझी एका चारचाकी आलिशान वाहनातून फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, युसूफ पूर्वी अटक केलेल्या गुन्ह्यातील संशयित असल्याची खात्री पटली. ााडीतील त्याचे साथीदारही ‘वॉन्टेड’ असल्याची खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेतले. सापडलेली गाडी (एमएच ११ बी एच १३५२) त्यांनी नऊ महिन्यांपूर्वी शंभरफुटी रस्त्यावरील मॉलजवळून चोरल्याची कबुली दिली. चौकशीत त्यांनी आणखी तीन साथीदार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनाही अटक केली. गेल्या दोन वर्षांपासून ते वाहने चोरत आहेत. आतापर्यंत त्यांनी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, राजगड, रत्नागिरी, बंगलोर, हुबळी व गुजरात राज्यांतून वाहने चोरली आहेत. टोळीच्या मुख्य सूत्रधाराचेही नाव निष्पन्न झाले आहे; पण तो फरारी झाला आहे. लवकरच त्यालाही अटक करण्यात यश येईल, असा विश्वास निरीक्षक घनवट यांनी व्यक्त केला.प्रत्येकाचा वेगळा ‘रोल’ सातजणांच्या टोळीतील प्रत्येकाचा ‘रोल’ वेगळा आहे. वाहने चोरणे, त्याचा इंजिन व चेसी नंबर काढणे, वाहन तोडून त्याचे स्पेअरपार्ट विकणे, स्क्रॅप केलेले वाहन खरेदी करणे, त्यास चोरलेल्या गाडीचे इंजिन व चेसी नंबर लावणे, असे प्रत्येकांकडे वेगवेगळे काम ठरवून दिले होते. वाहन चोरताना त्यांनी आतापर्यंत राज्य महामार्ग निवडले आहेत. महामार्गाला लागून जे लोक राहतात, त्यांचीच वाहने त्यांनी चोरली आहेत. जेणेकरून वाहन चोरल्यानंतर सुसाट वेगाने पळून जाता यावे, असा त्यांचा उद्देश असायचा. ‘धूम’ चित्रपटाप्रमाणे ही योजना आखण्यात आली होती. ज्या जिल्ह्यातील वाहन चोरायचे आहे, त्या जिल्ह्यातील वाहन पासिंगची नंबरप्लेट ते तयार करून घ्यायचे. वाहन चोरले की त्या वाहनाची मूळ नंबर प्लेट काढत होते आणि बोगस नंबर प्लेट लावत होते. त्यामुळे पोलिसांनाही संशय यायचा नाही. पोलिसांना चकवाकोल्हापुरात झालेल्या एका खून प्रकरणात संशयिताकडून वाहन जप्त केले होते. हे वाहन याच टोळीकडून खरेदी केले होते. इंजिन व चेसी क्रमांकानुसार वाहनांची कागदपत्रे व्यवस्थित असल्याने पोलिसांना जराही संशय आला नाही.पथकाचे कौतुकपोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार अशोक डगळे, बिरोबा नरळे, शंकर पाटील, संदीप मोरे, कुलदीप कांबळे, जितेंद्र जाधव, चेतन महाजन, सुभाष सूर्यवंशी, गोरखनाथ जाधव, श्यामकिशोर काबुगडे, सचिन सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीसप्रमुख फुलारी यांनी पथकाचे कौतुक केले. (प्रतिनिधी)स्क्रॅप वाहनातून कमाईअपघातात स्क्रॅप झालेली चारचाकी वाहने ते विमा कंपनीकडून खरेदी करायचे. जे वाहन खरेदी केले आहे, तसलेच वाहन ते चोरायचे. चोरलेल्या वाहनाचा इंजिन व चेसी क्रमांक काढून तो विमा कंपनीकडून घेतलेल्या वाहनास लावायचे. आरटीओ कार्यालयातून ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन ते वाहन अधिकृत नोंदणीकृत करायचे. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ते बाहेर विकायचे. तसेच स्क्रॅप झालेल्या वाहनांचे स्पेअरपार्ट विकूनही पैसे मिळवायचे.
सांगलीत वाहने चोरणारी टोळी जेरबंद
By admin | Published: October 20, 2015 11:29 PM