लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील महाराष्ट्र बँकेत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या मात्र पोलिसांना चाहूल लागल्याने नाशिककडे पलायन केलेल्या चौघा दरोडेखोरांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान घोटी टोलनाक्याजवळ वाहनासह जेरबंद केले आहे़
नाशिकचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी व अवैध व्यवसाय थोपविण्यासाठी जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात चेकपोस्ट सुरू करून सशस्त्र नाकाबंदी सुरू केली आहे़ शुक्रवारी (दि़२१) घोडबंदर रोडवरील महाराष्ट्र बँकेवर दरोडा टाकण्यासाठी जात होते़ मात्र त्यांना ठाणे पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी आपल्या स्विफ्ट डिझायर कारसह (एमएच ०४, एचवाय १२७१) नाशिककडे पळ काढला़
ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षास माहिती दिली असता घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे, पोलीस शिपाई एल़एऩसानप, जे़बी़दिंडे, डी़ए़आंबेकर यांनी टोलनाका परिसरात कार येताच त्यातील चौघांना ताब्यात घेतले़ हे चौघेही झारखंड येथील रहिवासी असून त्यांच्याकडून दोन आॅक्सिजन सिलिंडर, स्क्रू ड्रायव्हर, एक भारत गॅस कंपनीचे सिलिंडर व दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत़ या चौघांनाही पुढील कार्यवाहीसाठी ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़
ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दरोडा जबरी चोरी, अवैध मद्यवाहतूक, जनावरांची वाहतूक ही सीमावर्ती जिल्ह्यातून होत असल्याचे समोर आल्यानंतर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी त्यांनी सशस्त्र नाकाबंदी व गुप्त पॉईंट व चेकपोस्ट, दरोडाग्रस्त टिम जिल्हाभरात तयार केली आहे़ घटनेनंतर संबधित ठिकाणचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे जिल्ह्यातील पॉर्इंट सील करतात़ यामुळे सीमावर्ती राज्य व जिल्ह्यातून येणाऱ्या गुन्हेगार व गुन्हेगारीला आळा बसणार आहे़--इन्फो--पहिल्याच दिवशी दरोडेखोर जेरबंदसशस्त्र नाकाबंदी योजना सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी चार दरोडेखोरांना पकडण्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले आहे़ ही कामगिरी करणाऱ्या घोटीचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधीक्षक दराडे यांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे़