नवी मुंबई : एकाच युनियनच्या दोन माथाडी कामगार टोळ्यांमध्ये जबर हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी दोन्ही टोळीतील काही कामगारांना अटक केली आहे. कामाची आॅर्डर मिळालेल्या टोळीव्यतिरिक्त दुसऱ्या टोळीला काम दिल्यामुळे कामगारांमध्ये वाद होवून हा प्रकार घडला.एपीएमसी मार्केटमध्ये वाराईचे काम मिळवण्यावरून कामगारांमध्ये हाणामारीच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे मार्केट आवारात कामगारांमध्येच टोळी वॉर पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्याच दोन टोळ्यांमध्ये गुरुवारी दुपारी जबर हाणामारी झाली. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात दोन्ही टोळीतील कामगारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका टोळीला ग्रोसरी बोर्डाकडून वाराईची आॅर्डर मिळालेली असताना, त्या टोळीने दुसऱ्या टोळीला काम दिल्यामुळे हा प्रकार घडला. कामगारांच्या सदर टोळ्यांमध्ये काही दिवसांपासून वाराईच्या कामावरून वाद सुरू होता. परंतु माथाडीच्या एकाही नेत्याने त्याकडे लक्ष दिले नाही. यामुळे पोलिसांच्या मध्यस्थीनेच त्यांनी योग्य न्याय निवाडा केला होता. त्यानंतरही एका टोळीने वाराईच्या कामावर आपलाच अधिकार असल्याचे सांगत त्याठिकाणी काम करणाऱ्या टोळीवर हल्ला केला. त्यामुळे परिसरात दोन्ही बाजूने सुमारे ४०० ते ५०० कामगारांचा जमाव जमून गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.ग्रोसरी बोर्डाकडून माथाडींच्या ५०३९ क्रमांकाच्या टोळीला दाणा बंदरमधील एफ १९ क्रमांकाच्या गाळ्यातील वाराईच्या कामाची आॅर्डर मिळालेली. परंतु काही कारणाने त्यांची आॅर्डर रद्द करून ४२२५ क्रमांकाच्या टोळीला ती देण्यात आली. यानुसार ४२२५ क्रमांकाच्या टोळीने त्याठिकाणी वाराईचे काम करणे आवश्यक असतानाही या टोळीकडून ४२५८ क्रमांकाच्या टोळीला परस्पर त्याठिकाणी काम देण्यात आले. परंतु हा प्रकार धोरणाच्या विरुध्द असल्यामुळे ५०३९ क्रमांकाच्या टोळीतील कामगारांनी पोलिसांच्या मध्यस्थीने त्याठिकाणी कामाचा अधिकार मिळवला. यानुसार गुरुवारी संध्याकाळी सदर टोळीतले कामगार त्याठिकाणी काम करताना ४२५८ क्रमांकाच्या टोळीचे कामगार देखील त्याठिकाणी आल्यामुळे त्यांच्यात वाद होवून जबर हाणामारी झाली.>पालकमंत्र्यांची भेट घेणार!एकाच युनियनच्या दोन टोळ्यांमध्ये हाणामारी होवूनही माथाडींच्या नेत्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. माथाडी कामगारांचा एक गट लवकरच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे समजते. वाद मिटवण्याऐवजी वाढावा यासाठी ठरावीक टोळ्यांच्या बैठका घेतल्या जात असल्याचाही संताप कामगारांकडून व्यक्त होत आहे. ज्या टोळ्यांमध्ये नेतेमंडळी आहेत, त्याच टोळ्यांना अधिक काम मिळावे यासाठी सर्व खटाटोप होत असल्याची देखील चर्चा आहे.
माथाडींमध्ये टोळी वॉर
By admin | Published: June 13, 2016 3:06 AM