पुणे : मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि उष्मा वाढीस लागतो़ याची अनुभूती रविवारी राज्यातील अनेक शहरांत आली.दिवसाच्या तापमानात वाढ झाल्याने गोव्यासह राज्यातील काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ९़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ दरम्यान, पश्चिम बंगाल, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, दक्षिण हरियाणा आणि उत्तर राजस्थानच्या परिसरात मात्र थंडीची लाट सध्या सुरू आहे़ मात्र विदर्भातील काही भाग वगळता संपूर्ण राज्यातील किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे़ त्याचबरोबर दिवसाच्या तापमानातही वाढ झाल्याने रविवारी सर्वत्र उन्हाच्या झळा जाणवत होत्या. पुढील दोन दिवस तापमानात अशीच वाढ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़पश्चिम विदर्भात वातावरण अचानक ढगाळ झाले असून, रब्बी व खरीप हंगामातील तूर पीक काही ठिकाणी काढणीला आल्याने पावसाच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. ढगाळ वातावरणामुळे काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)पुणे १५़६, जळगाव १५़२, कोल्हापूर २०़१, महाबळेश्वर १६़८, मालेगाव १८़२, नाशिक १४़३, सांगली १७़९, सातारा १६़६, सोलापूर १८़९, मुंबई २२़५, सांताक्रुझ २१़८, अलिबाग २१़८, रत्नागिरी २१़८, पणजी २२़५, डहाणू २१़३, औरंगाबाद १५़४, परभणी १४़५, अकोला १७़५, अमरावती १६़८, बुलढाणा १८़२, ब्रह्मपुरी १२़८, चंद्रपूर १३़२, गोंदिया ९़७, नागपूर १३, वर्धा १५़५, यवतमाळ १८़
तापमानात लक्षणीय वाढ, गोंदियात थंडी कायम; दोन दिवस पारा चढाच राहण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 2:29 AM