शिर्डी - महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून साईबाबांना आज, बुधवारी पहाटे गंगाजलाभिषेक करण्यात आला. पहिला महाराष्ट्र दिन साईसंस्थानात चार दिवस अगोदरच साजरा झाला होता याचीही आठवण आज झाली.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी दीपक मुगळीकर उत्तर प्रदेशात निवडणूक निरीक्षक म्हणून कार्यरत होते त्या मतदार संघातून गंगा वाहते. काल, मंगळवारी निवडणुक कामकाज आटोपून ते शिर्डीला निघाले तेव्हा त्यांनी पवित्र असलेल्या ब्रम्हावर्त क्षेत्रातून गंगाजल आणले. आज पहाटे मुगळीकर गंगाजलासह शिर्डीत दाखल झाले. त्यानंतर पहाटेच्या साईंच्या स्नानासाठी आणलेले गंगाजल वापरण्यात आले. या जलाभिषेकाचे पौरोहित्य बाळासाहेब जोशी यांनी केले. यावेळी मंदिर प्रमुख रमेशराव चौधरी, सुनील तांबे उपस्थीत होते.
मुगळीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साईसंस्थानात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ़ आकाश किसवे, सूर्यभान गमे, दिलीप उगले, अशोक औटी, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव आदींची उपस्थिती होती.
गेल्या १५ एप्रील रोजी गुजरातचे भाविक रामरतन हरीयानी हे स्कॅनर मध्ये आपली बॅग विसरून गेले होतेे. या बॅगेत १ लाख ६७ हजार रूपये होते. ही रक्कम प्रामाणिकपणे परत करणारे कंत्राटी सुरक्षा रक्षक सिंधुबाई किसन आंबेडकर व बाळु नामदेव कराड यांना आदर्श कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्याबरोबरच मुख्य कार्यकारी अधिकारी मुगळीकर यांनी त्यांना प्रत्येकी पाच हजाराचे बक्षीस व्यक्तीश: दिले.
एकोणसाठ वर्षापुर्वी साईसंस्थानात चार दिवस अगोदर महाराष्ट्र दिन साजरा-२५ एप्रील १९६० रोजी महाराष्ट्र निर्मीतीची घोषणा झाली. त्यानंतर लगेच बुधवार २७ एप्रील १९६० रोजी साईमंदीराच्या गच्चीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून ध्वजवंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गावातील प्रतिष्ठीत, संस्थान कर्मचारी व शाळेची मुले उपस्थित होती. या निमित्ताने दुपारी विविध खेळ, गायन व कीर्तनाचे तर रात्री जेवणाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र निर्मीतीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मंदीरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रम संस्थान व्यवस्थापक शेटे यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने गावातील श्रीसाईनाथ नाट्यमंडळाने रक्ताचे नाते हे सामाजिक नाटक सादर केले़ यानंतर चार दिवसांनी १ मे रोजी राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा झाला