डोंबिवली : पूर्वेतील पी अॅण्ड टी कॉलनीमधील गंगा सोसायटीत अखेर दीड वर्षानंतर नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे इमारतीतील ४० सदनिकाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘लोकमत’ने बातम्यांच्या माध्यमातून तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने हे शक्य होत असल्याची प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केली.केडीएमसीच्या स्थायी समिती सभेत तसेच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली होती. त्या वेळी तेथील भीषण पाणीटंचाई पाहून त्यांनी केडीएमसीच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले होते. ८४ हजारांची पाणीपट्टी या सोसायटीने पाणी येत नसतानाही भरली आहे. तरीही, त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. जेथे बेकायदा नळजोडण्या आहेत, तेथे त्यांना मुबलक पाणी मिळत होते. त्यामुळे म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना हा विरोधाभास का, असा सवाल केला. म्हात्रे यांच्या या ‘स्टाइल’चा अनुभव अधिकाऱ्यांना असल्याने तातडीने सूत्रे हलली. पाण्याच्या मुख्य जलवाहिनीशी गंगा सोसायटीची लाइन जोडण्याचे काम दोन दिवसांत तातडीने हाती घेण्यात आले. मंगळवार आणि बुधवारी सुमारे १४०० फुटांवरून पाइप टाकण्यात आले. या भागात शुक्रवारी शटडाउन असल्याने शनिवारपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर, रहिवाशांना पिण्याचे पाणी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, दीड वर्षानंतर नळाला पाणी येणार असल्याने रहिवाशांनी म्हात्रे, स्थानिक नगरसेविका रूपाली म्हात्रे, माजी नगरसेवक रवी म्हात्रे, महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, महापालिकेचे उपअभियंते योगेंद्र राठोड, देवेंद्र एकांडे आणि प्लंबर विलास विधाते यांचे आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)‘लोकमत’ने फोडली वाचा‘लोकमत’ने दीर्घकाळ भेडसावणाऱ्या समस्येला वाचा फोडली आहे. अवघ्या महिनाभरात या समस्येची निदान दखल महापालिकेने घेतली. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना आमच्या सोसायटीतील पाणीटंचाईची तीव्रता समजली. पाणीसमस्या निकाली निघत असल्याने गंगा सोसायटीतील रहिवासी ज्ञानेश्वर गाईगोळे, दिलीप डुंबरे, रमेश बेळणेकर, आनंद लोहार, संजय पवार, विनय नायर, नंदू आवळेगावकर, तुषार मुकीरवार आदींनी ‘लोकमत’चे आभार मानले.
गंगा सोसायटीत दीड वर्षाने आली ‘गंगा’
By admin | Published: April 06, 2017 3:49 AM