मुंबई - नुकतेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्या एका गुंडाचा फोटो व्हायरल झाला. त्यानंतर आता खुद्द मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जामिनावर बाहेर असलेल्या गुंडासोबत फोटो विरोधकांनी ट्विट केला आहे. इतकेच नाही तर या गुंडाने मंत्रालयात इन्स्टा रिलही बनवली. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की,महायुती सरकार राज्यातील गुंडांना अभय देत असून सरकारच्या मेहेरबानीने हे गुंड राजरोस फिरत आहेत. जामिनावर सुटलेला गुंड निलेश घायवाळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटतो. मंत्रालयात बिनधास्त फिरतो. मंत्रालयात रिल्स बनवतो. सामान्य माणूस मात्र रांगेत उभा असतो. यालाच अच्छे दिन म्हणायचं का? असा सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी गुंडांना राजाश्रय मिळत असल्याच्या मुद्यांवरून सरकारवर तोफ डागली.
तसेच रोज एक नवा गुंड सरकारच्या भेटीला येत असून सरकारमधील मंत्र्यांना, काही मंत्र्यांच्या मुलांना याचे काहीच वाटत नाही. म्हणजे सरकार गुंडांना अभय देत असून या सरकारच्या काळात गुंडाराज सुरू असल्याचे स्पष्ट आहे. गुंड मंत्रालयात बिनधास्त फिरतायत आणि सामान्य जनता मात्र बाहेर रांगेत उभा असते. याची सरकारला लाज देखील वाटत नाही अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे.
दरम्यान, सध्याचे सरकार म्हणजे सरकार निर्मित गुंडाराज आहे. एकीकडे सर्वसामान्य गोर-गरीब जनतेला मंत्रालयाच्या उंबरठ्यात तासनतास ताटकळत उभं राहावं लागतं. महिनोन्महिने खेटा घालाव्या लागतात. हे गुंड थेट मंत्रालयाच्या प्रांगणात रिल्स शूट करत आहेत. सरकार केवळ गुंडांच्या आणि मुजोरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा हा आणखी एक दाखला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटानेही सरकारवर निशाणा साधला.
संजय राऊतांनी शिंदेंना सुनावले
महाराष्ट्रासारखं मोठं राज्य हा गुंडगिरीचा सर्वात मोठा अड्डा झालाय. बेकायदेशीर जे मुख्यमंत्री नेमलेत ते गुंडांना पोसतायेत. पोलीस स्टेशनमध्ये आमदार गोळीबार करतायेत. मोदी काही बोलले का? असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टार्गेट केले. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, राज्यातील मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर, मंत्रालयात ज्याप्रकारे गुंड टोळ्या येऊन भेटतायेत. शासकीय निवासस्थानी खून, दरोडे, बलात्कार या गुन्ह्यात जामीनावर सुटलेले आणि बाहेर काढलेले या गुंड टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करत आहेत. या गुंड टोळ्याचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्री करणार की उद्याच्या निवडणुकीत विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी करणार आहेत असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.