लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नालासोपारा येथील एका प्रसिद्ध हॉटेलच्या कॅशियरवर तसेच उल्हासनगरातील वॉइन शॉपवर केलेल्या गोळीबार प्रकरणी गँगस्टर सुरेश पुजारीच्या तीन हस्तकांना शुक्रवारी गुन्हे शाखेने अटक केली. पैशांच्या वाटपासह त्यांचा नवा डाव गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उधळून लावला आहे. राज शेषराव चौहान (२५, विलेपार्ले), अली अब्बास जफ्फर खान (२७, कुर्ला), सुधाकर सुंदर ख्रिस्टोप्रिया (५२, सुरत) अशी अटक आरोपींची नावे आहेत.कुर्ला परिसरात पुजारी टोळीतील तिघे येणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वस्त, पोलीस निरीक्षक सचिन कदम, संजीव धुमाळ, साहाय्यक पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, संतोष नाटकर, विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील सोनावणे, साहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णाजी सावंत यांनी अधिक तपासाअंती शुक्रवारी रात्री कुर्ला येथून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून ७.६५ बोअरचे पिस्तूल, दोन मॅगझीन, ८ जिवंत काडतुसे, मोबाइल, दोन मोटारसायकलसह २ लाख ५० हजारांची रोकड जप्त करण्यात आली. त्यांच्या चौकशीत नालासोपारा आणि उल्हासनगर येथील गोळीबारामागचे गूढ उलगडले आहे. पुजारीच्या सांगण्यावरून त्यांनी २७ एप्रिल रोजी उल्हासनगर येथील एका वॉइन शॉपच्या काउंटरवर सुरेश पुजारीच्या नावाने खंडणीसाठी चिठ्ठी ठेवून गोळीबार करून त्यांनी पळ काढला. या गुन्ह्यातील करिज्मा बाइक जप्त करण्यात आली आहे. याच त्रिकूटाने ७ मे रोजी नालासोपारा येथे हॉटेलच्या कॅशियरवरही गोळीबार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. दोन्हीही गुन्ह्यांतील त्रिकूटाचा सहभाग समोर आला असून त्यानुसार नालासोपारा व उल्हासनगर पोलीस त्यांचा ताबा घेणार आहेत.
गँगस्टर सुरेश पुजारीच्या तीन हस्तकांना अटक
By admin | Published: May 14, 2017 5:17 AM