राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाकडे राहिल की अजित पवार गटाकडे जाईल याचे काय करायचे ते निवडणूक आयोग ठरवेल. चिन्ह आणि पक्ष हे अजित पवार गटाचे असल्याचा आमचा दावा आहे. यासाठीचे ट्रकभरून पुरावे आम्ही दिले आहेत, असा दावा अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. याचबरोबर त्यांनी संजय राऊतांना देखील प्रत्यूत्तर दिले आहे.
महाराष्ट्रामध्ये कमजोर व अस्थिर सरकार बसले आहे. मुख्यमंत्र्यांना कोणी जुमानत नाही भाजपवाले त्यांना जुमानत नाहीत. कॅबिनेटमध्ये गँगवॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्याची परिस्थिती सुरू आहे, ही परिस्थिती याआधी निर्माण झाली नव्हती. मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवरती नियंत्रण मिळू शकत नाही तर मंत्र्यांमध्ये प्रमुख म्हणून बसण्याचा त्यांना अधिकार नाही, असे संजय राऊत म्हणाले होते. यावर मुश्रीफांनी राऊतांना आव्हान दिले आहे.
राऊतांचा आरोप निखालस खोटा आहे असा कोणताही वाद झाला नाही. ही चुकीची माहिती आहे. संजय राऊत हे सिद्ध करू शकले की अंगावर धावून वगैरे गेले, तर आम्ही मंत्रीपदाचा राजीनामा देऊ, असे आव्हान मुश्रीफ यांनी दिले आहे.
याचबरोबर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे, अशी सर्वांचीच मागणी आहे. त्यामुळेच आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. ज्यांना कुणबी दाखले आहेत, त्यांना ओबीसी आरक्षण द्यावे, असे भुजबळ देखील बोलले आहेत. त्यामुळे कोणताही वाद नाही. कुणीही गैरसमज करुन घेऊ नये, असेही भुजबळ आणि इतर मंत्र्यांच्या वादावर मुश्रीफांनी स्पष्ट केले.