हप्तेबाज गुंडाला मारहाण : प्रतिस्पर्ध्यांनी घडविली अद्दल जगदीश जोशी - नागपूर मध्यवर्ती तुरुंग प्रशासनाचे ‘पाप’ उघडकीस आल्यानंतर आता तुरुंगाच्या आतच गँगवार भडकले आहे. तुरुंगातून हप्ता वसुलीसाठी धमकावणारा गुन्हेगार अमर लोहकरे याला इतर गुंडांनी तुरुंगात बेदम झोडपले. सुरक्षा रक्षक वेळेवर आल्याने लोहकरेचा जीव वाचला. या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या प्रतिस्पर्धी गुन्हेगारांची सुरक्षा रक्षकांनी चांगलीच धुलाई केली. मध्यवर्ती तुरुंग हे नेहमीच चर्चेच राहत असते. सुरज अरखेल नावाचा कैदी आपल्या प्रेयसीला घेऊन गेल्याचे उदाहरण ताजे असताना मागील पाच दिवसांपासून तुरुंगात गँगवार सुरू झाले आहे. मकोका अंतर्गत अटक करण्यात आलेला गुंड अमर लोहकरे सध्या तुरुंगात आहे. परंतु तुरुंगातूनच तो फोनवर हप्ता वसुलीसाठी धमकी देत असल्याबाबत गेल्या ७ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पहिल्यांदा तुरुंग प्रशासन अडचणीत आले होते. या घटनेनंतर तुरुंगातील एकेक प्रकार उघडकीस आले. अमर लोहकरे हा अजनीतील पिंकू घोंगरे हत्याकांडातील आरोपी आहे. पिंकू हत्याकांडाचा सूत्रधार सुमित अमरावती तुरुंगात आहे. सूत्रांनुसार पिंकूच्या हत्येचे कारण अमरसोबतचा वादच होता. अमरचा पिंकूसोबत वाद सुरू असल्याने त्याचा बदला घेणे अमरच्या एकट्याच्या हातचे काम नव्हते. अमर तेव्हा चिंतलवार गँगसोबत जुळला होता. पिंकूच्या हत्येप्रकरणी चिंतलवार गँगच्या डझनभर सदस्यांना आरोपी बनविण्यात आले होते. हत्येच्या काही दिवसानंतरच सुमित चिंतलवार सोडून बहुतांश आरोपी जामिनावर सुटले होते. उच्च न्यायालयात नयन चिंतलवारचा जामीन रद्द झाला होता. न्यायालयाच्या निर्णय होत असताना नयन अजनी पोलीस ठाण्यात होता. तो पोलीस ठाण्यातून पळून गेला होता. न्यायालयातील एका बाबूने त्याला फोनवर माहिती दिली होती.दीड वर्ष उलटल्यानंतरही नयन पोलिसांच्या हाती लागला नाही. पिंकूच्या हत्येनंतर अमर लोहकरेचा दक्षिण नागपुरात दबदबा वाढला. त्याने कमी वेळातच खूप पैसा कमावला. त्याने अजनीतील माया गँगमध्ये सुद्धा आपला दबदबा वाढविला. त्याचा दबदबा वाढल्याने तो चिंतलवार गँगशी तुच्छतेने वागू लागला. नयन चिंतलवारला त्याचे वागणे खटकले. गणेशपेठ एसटी स्टॅण्ड चौकात ९ जून रोजी सूरज जयस्वाल याचा खून करतानासुद्धा अमर लोहकरे आणि माया गँगने चिंतलवार गँगचे म्हणणे ऐकले नव्हते. अमरने उलट तुरुंगात असलेला चिंतलवार गँगच्या रोहित रामटेकेला मारहाण केली होती. तेव्हापासून चिंतलवार गँग अमरला धडा शिकविण्याच्या संधीच्या शोधात होती. रोहित रामटेके, अजित सातपुते, सेवक मसराम, पवन ऊर्फ आलू आणि राकेश ऊर्फ छोट्या वाघमारे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी काही दिवसांपूर्वी अमर लोहकरेची धुलाई केली. ठाकूर गँग होते लक्ष्य सूत्रानुसार माया गँगला दक्षिण नागपुरातील ठाकूर गँगच्या म्होरक्याची सुपारी देण्यात आली होती. परंतु माया गँगने ठाकूर गँगचा एक सदस्य असलेल्या सूरज जयस्वालचा खून केला. तेव्हापासून चिंतलवार बंधू अ1मरचा राग करीत होते. हत्याकांडातील साक्षीदाराला धमकाविल्यामुळे आणखीनच वाद निर्माण झाला. सुपारी किलिंग गुन्हेगारअमर लोहकरेवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांसाठी खून करणे सर्वात सोपे काम आहे. सर्वांनीच खुनाची हॅट्ट्रिक केली आहे. सुपारी किलिंग किंवा बदला घेण्यासाठी ते कुख्यात आहेत. प्रत्येकाच्या गँगमध्ये ८ ते १० सदस्य आहे. त्यामुळेच अजित सातपुते याला सोडून सर्वांविरुद्ध मकोकाची कारवाई करण्यात आली. वाडीतील रोशन कांबळे हत्याकांडातील सूत्रधार अजित सातपुतेच्या विरुद्ध तीन खुनासह १५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तुरुंगात गँगवॉर !
By admin | Published: September 22, 2014 1:00 AM