ऑनलाइन लोकमत/हितेंद्र काळुंखे
जळगाव, दि. 16 - चाळीसगाव... गावाचे नाव ऐकताच कोणीही अवाक् होतो. अगदीच वेगळे हे नाव... एखाद्या संख्येने गावाचे नाव कदाचित अन्यत्र नसावेच. अशा या चाळीसगावची आणखी एक विशेष ओळख निर्माण होऊ पाहत आहे. ती म्हणजे अनोखी गणितनगरी. संख्या म्हटली की, गणित आलेच आणि गणितनगरीनिमित्ताने चाळीसगाव आणि गणितनगरी हे समीकरण आता पूर्ण होऊ पाहत आहे.
कलामहर्षी केकी मूस, पाटणादेवी, भास्कराचार्य यांच्यामुळे चाळीसगावचा लौकिक आहे. यापैकी गणिततज्ज्ञ भास्कराचार्यांच्या स्मृती कायम राहाव्यात, यासाठी गणितनगरीची संकल्पना आमदार उन्मेष पाटील यांनी मांडली आणि त्यास मंजुरीनंतर जागतिक दर्जाची गणितनगरी साकारण्याच्या दृष्टीने कार्यवाही वेगात होताना दिसत आहेत. कामकाजाचे एकेक पाऊल पुढे पडू लागले आहे.
यासाठी पाटणादेवीचा निसर्गरम्य परिसर निवडण्यात आला आहे. याच सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या विज्जलवीड (आजचे पाटणादेवी ता.चाळीसगाव) भास्कराचार्यांनी त्यांच्या काव्यमय लेखन शैलीतून गणित विश्वावर साम्राज्य निर्माण केले. इ.स.१११४ ते ११८५ या कालखंडात भास्कराचार्यांनी अंकगणित, बीजगणित, त्रिकोणमिती, खगोलशास्त्र, नक्षत्रशास्त्र इ. ज्ञानशाखांमध्ये बहुमोल योगदान दिले.
म्हणून त्यांना गणितसूर्य भास्कराचार्य असे संबोधले जाते. अशा या गणिती भास्कराचार्यांनी ज्या परिसरात इतके महान कार्य केले, त्या पाटणादेवी परिसराची ओळख पुन्हा एकदा गणिताची ज्ञानार्जन भूमी (कर्मभूमी) म्हणून सर्वसामान्यांना व्हावी, हाच गणितनगरी निर्मितीमागील उद्देश होय. पाटणादेवीच्या भूमीत गणितीय, खगोलशास्त्राची प्रथा व परंपरा अकराव्या शतकापासून सुरू झाली होती. त्याचे पुनर्जीवन करण्यासाठी ‘भास्कराचार्य गणितनगरी’ तयार करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला आणि प्रयत्नांना यश आले.
पर्यटनीय ठेवा होणार अधिक समृद्धमुळातच २६० चौरस किलोमीटर मीटरचे गौताळा अभयारण्य, पितळखोरे येथील लेणी, प्राचीन शिलालेखांसह इतिहासाची साक्ष देणारे चंडिकादेवीचे हेमाडपंथी मंदिर, विस्तीर्ण घनदाट जंगलाच्या आश्रयाने राहणारे मोरांचे थवे, बिबटे, ससे, हरणांसह २३२ प्रकारचे पक्षी, ३२ प्रकारची फुलपाखरे, लीलावती उद्यान आणि परिसरात जवळपास ८०० हून अधिक प्रकारच्या वनौषधींनी नटलेल्या या भू-भागावर वनसंपदेचा उपजत पर्यटनीय ठेवा अधिक समृद्ध करता येणार आहे.
गणिताचे एक हजारांहून अधिक खेळया ‘भास्कराचार्य गणितनगरीत’ गणिताच्या एक हजारांहून अधिक खेळांचा समावेश असेल. बालगोपालांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी गणिताचे एक हजार खेळ गणित संकल्पनेवर आधारित असतील.
गणिती उद्यानाची निर्मितीगणिती संदर्भ साहित्यांची माहिती देणारे अद्ययावत ग्रंथदालन तसेच गणिती संकल्पनांच्या संशोधनासाठी स्वतंत्र दालनाची निर्मिती केली जाणार आहे.
संशोधनासाठी स्वतंत्र ग्रंथदालनगणिताची गोडी लागावी, या दृष्टिकोनातून गणित आणि खगोलशास्त्राच्या विषयांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी तारांगणाचादेखील त्यात समावेश असेल. गणित, खगोलशास्त्राचा आणि नक्षत्र विज्ञान विषयाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी तारांगण त्याचप्रमाणे निरनिराळ्या ग्रह-ताऱ्यांचे दर्शन घडवणारी सफर करता येईल. यामुळे ग्रह-ताऱ्यांचे दर्शन घडेल.
मॅथ क्लिनिक‘मॅथ क्लिनिक’ ऐकून आश्चर्य वाटले पण, गणिती दवाखान्याची संकल्पना येथे पाहायला मिळेल. त्या जोडीला पारंपरिक भारतीय गणित, वैदिक गणित तसेच वेगवेगळे गणिती प्रशिक्षण इथे उपलब्ध होऊ शकेल.
वैदिक गणितांचे प्रशिक्षणअद्ययावत आणि जागतिक दर्जाच्या या भास्कराचार्य मॅथ सिटीमुळे भावी पिढीला गणिताबद्दल आकर्षण, गणिताचे हसत-खेळत शिक्षण आणि संशोधन करण्यास मोठा हातभार लागू शकणार आहे. दोन टप्प्यात होणार कामेगणितनगरीचे काम दोन टप्प्यात हाती घेतले जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात विविध १३ कामे असून त्यात प्रवेशद्वार, पथिकाश्रम (विश्रामगृह), हत्ती बंगला, लीलावती गार्डन आणि ग्रंथालय आदींचे नूतनीकरण करून या ठिकाणी काही बदल केले जाणार आहे. पथिकाश्रमाच्या जागेवर खुले प्रेक्षागृह उभारण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सभागृह (६०० स्क्वे. मी.), तारांगण (५५० स्क्वे. मी.), संशोधन केंद्र (३०० स्क्वे. मी.), परिषद सुविधा केंद्र (६०० स्क्वे. मी.) आदी कामे केले जाणार आहेत.गणितनगरीसाठी शासनाच्या मंजुरीनंतर प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो शासनाकडे पाठवलासुद्धा आहे. या कामासाठी मुख्यमंत्री विविध खात्यांचे मंत्री तसेच अधिकारी वर्ग यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. येत्या अधिवेशनात या प्रकल्पासाठी भरीव निधी मिळण्याची अपेक्षा आहे.-उन्मेष पाटील, आमदार, चाळीसगाव