Ganpati Festival 2018 : राज्यातील गणेश मूर्तींसाठी शास्त्रशुद्ध जानवे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 03:40 PM2018-09-14T15:40:10+5:302018-09-14T15:40:55+5:30
- निशिकान्त मायी
लातूर : मुंबई-पुण्यातील भव्य-दिव्य श्रीगणेश मूर्तींसह लालबागच्या राजा गणपतीसाठी शास्त्रशुद्ध जानवे तयार करून दरवर्षी पाठविले जाते. विशेषत: महाराष्ट्रात ब्रह्मगाठीच्या जानव्यांना मागणी असते, अशी माहिती शास्त्रोक्त जानवे निर्मिती करणारे श्याम चेंडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
जानवे अर्थात यज्ञोपवित निर्मितीचा व्यवसाय विस्तारला आहे. अकोला येथील श्याम चेंडके हे लालबागच्या राजासह अनेक भव्य गणेश मूर्तींसाठी जानवे तयार करतात. विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी तयार केलेले जानवे पोहोचले आहेत. जानवे तयार करणे ही एक कला असून त्यासाठी त्यांनी एक मशीनही तयार करून घेतली आहे. त्या माध्यमातून एकावेळी अनेक जानवे ते तयार करून त्याचे आकर्षक पॅकिंग बनवून पुरवितात. ब्रह्मगाठीच्या जानव्याला अधिक मागणी असल्याचे ते म्हणाले.
कोल्हापुरात प्रशिक्षण...
जानव्याचे शिवगाठ व ब्रह्मगाठ असे दोन प्रकार प्रचलित आहेत. जानव्याचा धागा हा ९ पदरी असतो. त्याला एकत्र करून त्रिसूत्री आकार देण्यात येतो. शिवगाठीचे जानवे साधारणपणे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात वापरले जातात तर ब्रह्मगाठीचे जानवे महाराष्ट्रात प्रचलित आहेत. त्यासाठी चेंडके यांनी कोल्हापूर येथे खास प्रशिक्षण घेतले आहे. त्यात प्रावीण्य मिळविल्यानंतरच त्यांनी या व्यवसायाशी गाठ बांधली.
जानव्याचे महत्त्व अबाधित...
हिंदू समुदायातील अनेक लोक धार्मिक विधीसाठी जानव्याला महत्त्व देतात. याशिवाय विवाह आणि मौंज या कार्यासाठी जानवे गरजेचे असते. अगदी पाच ते सात रुपयांच्या अल्प किमतीत असलेले हे सूत्र व्यवसायात आताशा मोठी उलाढाल करू पाहात आहे. १०० टक्के कॉटन धाग्यापासून बनलेले हे जानवे श्रीगणेशाला पूजेच्या विधीवेळी घालण्यात येते.