संजय रामाणी ल्ल गणपतीपुळे रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे हे जागतिक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. येथे येणाऱ्या देश-विदेशातील भक्त - पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसांनी सुरु होणाऱ्या दिवाळी पर्यटक हंगामासाठी गणपतीपुळेसह परिसर सज्ज झाला आहे. सुटीच्या हंगामात बहुतांशी पर्यटक गणपतीपुळे ठिकाणाला पसंती देतात. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात असतो. गणपतीपुळेसह परिसरातील हॉटेल्ससह लॉजींग व रिसॉर्ट व्यावसायिकांनी खोल्यांची डागडुजी व रंगरंगोटी करुन विविध सेवा-सुविधा पूर्ववत सुरु केल्या आहेत. तसेच पर्यटकांना विविध पॅकेजेस देण्यात येत असून, यामध्ये खोलीच्या भाड्याबरोबरच चहा, नाश्ता, जेवण, परिसर दर्शन आदी विविध पॅकेजेस ठेवण्यात आली आहेत. जेणे करून पर्यटक अधिक आकर्षक होऊन गणपतीपुळ्याला पसंती देतील. श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील बीचवरील दुकाने ग्रामपंचायत गणपतीपुळे यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी लावण्यात आली असून, यामध्ये नारळपाणी, भेळपुरी, कोकणी मेवा, सरबत, बर्फगोळा, फोटोग्राफी, विविध खेळण्यांची दुकाने तसेच वेगळे आकर्षण लाँगर (सनबाथ)साठी ठेवण्यात आले आहेत. तसेच बीचवरती उंट, घोडागाडी, बाईक आदी सेवासुविधा बीचवरती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. गणपतीपुळे येथे वाहतुकीची होणारी कोंडी पाहता ग्रामपंचायत गणपतीपुळे यांनी केलेला एकदिशा मार्ग चुकीचा व त्रासदायक ठरत असून, सदरील मार्गात बदल व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टळेल व पार्किंगचा प्रश्नही सुटेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जुन्या एकदिशा मार्गात बदल करुन कोल्हापूर तिठ्यातून आत येताच ग्रामपंचायत प्रवासी कर घेण्यात येणार असून, मोरया चौकात काही गाड्या पार्किं ग होणार आहेत. पुढे पे पार्किंग सुविधा व स्मशानभूमी परिसरात ‘फ्री पार्किंग’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दिवाळी पर्यटक हंगाम असल्याने लॉजींग व रिसॉर्टच्या दरात वाढ झाल्याने खासगी लॉजींगमध्ये ५०० रुपयापासून १५,००० रुपयापर्यंत दर आकारण्यात येत आहे. मात्र देवस्थानच्या भक्त निवासाचे दर मात्र पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत. दिवाळी हंगामासाठी देवस्थानमार्फत भक्तांना व्यवस्थित दर्शनासाठी रांगेची सुविधा, नेहमीप्रमाणे दुपारी खिचडी प्रसाद, संध्याकाळी दीपोत्सवानंतर पुलाव प्रसाद देण्यात येत आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टर लावण्यात आला आहे. बीच सुरक्षेसाठी वॉच टॉवर, सुरक्षारक्षक तसेच फिरते सुरक्षारक्षक देवस्थानमार्फ त ठेवण्यात आले आहेत. तसेच पर्यटक निवास गणपतीपुळे मार्फत सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच दृष्टीने गणपतीपुळे व परिसरातील सर्व उद्योगधंदे, व्यावसायिक दिवाळी पर्यटक हंगामासाठी सज्ज झाले आहेत.
विविध पॅकेजेस : एकदिशा मार्गात बदल? ४पर्यटन व्यावसायिकांचे विविध पॅकेजेस. ४बोटींग व पॅरासिलींग सुविधा. ४एकदिशा मार्गात बदल. ४रिसॉर्ट, लॉजींग दरात वाढ. ४वॉच टॉवर सुरक्षा.