सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील कचरा उचलण्याच्या ठेक्याची मुदत संपण्यापूर्वी महापालिकेने नवीन ठेकेदार नियुक्त केला नाहीतर, कचऱ्याची टांगती तलवार शहरवासियावर उभी टांगली जाणार आहे. कचऱ्याचा ठेका देण्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली असून तत्कालीन ठेक्याच्या कार्यपद्धतीवर सर्वस्तरातून टीका होत आहे.
उल्हासनगरातील कचरा उचलण्याचा ठेका महापालिकेने कोणार्क नावाच्या कंपनीला दिला असून कंपनीचा ठेका ५ डिसेंबरला संपणार आहे. महापालिका कचरा उचलण्यावर दररोज ४ लाख तर वर्षाला १५ कोटी पेक्षा जास्त खर्च करीत आहेत. महापालिका आरोग्य विभागाने ठेका संपण्यापूर्वी नवीन ठेका देण्याबाबत प्रक्रिया करणे गरजेचे आहे. मात्र ठेक्याच्या मुदत संपण्याला एक महिन्याच्या कालावधी बाकी असतांना नवीन ठेका प्रक्रिया सुरू केली. अशी माहिती आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली. दिवाळी सणा दरम्यान कचऱ्यात वाढ झाल्याने, कचरा उचलण्यासाठी जास्तीची साधनसामग्री लावल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी दिली. असे असतांना शहरातील अनेक कचरा कुंड्या ओव्हरफ्लॉ झाल्याचे चित्र शहरात आहे.
महापालिका कचरा उचलण्यावर वर्षाला १५ कोटी पेक्षा खर्च करीत असून डम्पिंग ग्राऊंड वरील कचरा सफाटीकरणावर ३ कोटी खर्च केला जात आहे. तसेच शहरातील डेब्रिज उचलण्यावर ३ कोटी पेक्षा जास्त खर्च केला जात असूनही शहरातील विविध भागात कचरा, डेब्रिजचे ढिग दिसत आहे. वर्षाला १५ कोटी पेक्षा जास्त खर्च एकट्या कचरा उचलण्याच्या ठेक्यावर करूनही कचऱ्याचे साम्राज्य शहरात आहे. कचरा ठेका देण्याची निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडल्यास, यापेक्षा कमी किंमतीला कचरा उचलनारा ठेकेदार महापालिकेला मिळू शकतो. असेही बोलले जाते. मात्र महापालिका महासभेत महत्वाच्या विषयावर विरोधी पक्ष आपली भूमिका वठवित नसल्याचे चित्र शहरात आहे. २७० कंत्राटी कामगार ठेका व मालमत्ता सर्वेक्षण व मॅपिंग ठेक्याच्या वेळी सत्ताधारी शिवसेना व विरोधी पक्ष भाजप एकत्र आल्याचे गेल्या महिन्यात शहरवासीयांनी पाहिले आहे.
कचऱ्याचा ठेकेदार बदलण्याची मागणी?
शहरातील कचरा नियमित उचलला जात नसून दिवाळी सणा समोर शहर कचऱ्यात हरविल्याचा भास होतो. तसेच ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवर बहुतांश नगरसेवक व नागरिकांनी नापसंती दर्शविली आहे. नवीन ठेकेदार नियुक्ती करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.